Site icon LNN

बॅचविना प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना मनसे वाहतूक सेनेचा दणका; आरटीओकडून २७ वाहनांवर कारवाई

कल्याण | १८ जून :

बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी कंपनीच्या कार तसेच इतर वाहनांवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज कल्याण परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान बॅचविना प्रवासी वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांना कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) आणण्यात आले. (MNS Transport Wing Cracks Down on Unauthorized Passenger Vehicles; RTO Takes Action Against 27 Vehicles)

या कारवाईत एकूण २७ वाहनांवर आरटीओ प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन चालकांकडे आवश्यक बॅच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्येक वाहनास ₹५ हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ही कारवाई महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे नेते संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रणय साटम, वाहतूक सेना चिटणीस रुपेश नांगडे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.


प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात नियमांचे पालन व्हावे, बेकायदेशीर वाहतुकीला आळा बसावा आणि अधिकृत वाहन चालकांवर अन्याय होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात आंदोलन आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Exit mobile version