Site icon LNN

कल्याण डोंबिवलीच्या ६ प्रभागक्षेत्रांत २ हजार ३०० टनांहून अधिक कचरा संकलन ; नागरिकांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद!

 

कल्याण डोंबिवली दि.10 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ७ प्रभागांसाठी अवघ्या ३ महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड, जे, फ, ग, ह आणि आय या ६ प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित एका प्रभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या सहाही प्रभाग क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत (इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग – itac) तब्बल २ हजार ३६३ टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे.

चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या१० पैकी ७ प्रभागांतील कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेच्या ई प्रभागक्षेत्र वगळता उर्वरित ६ प्रभाग क्षेत्रामध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. आजच्या तारखेपर्यंत ड, जे, फ, ग, ह आणि आय प्रभागांत पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित एका प्रभागाची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या Itac म्हणजेच initial total area cleaning मोहिमेत तब्बल २ हजार ३०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात आला. आता यापुढे या सहाही प्रभागांमध्ये नियमितपणे दिवसातून ३ वेळा कचरा उचलण्यात येणार आहे.

तर या प्रभागांतील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही सतत कचरा टाकण्यात येत असल्याने अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून या प्रभागांचीही आता स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत प्रभागक्षेत्रनिहाय कचरा संकलन
ड प्रभाग ४३६ टन – १९ मे ते २ जून
जे प्रभाग ८१६ टन – २४ मे ते २५ जून
फ प्रभाग ६८ टन – २४ जून ते ६जुलै
ग प्रभाग ४१.१६ टन -६जुलै ते १३ जुलै
ह प्रभाग १४६ टन – ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट
आय प्रभाग – ८५६ टन-१२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

Exit mobile version