Site icon LNN

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टरेट देणाऱ्या ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार मास्टर्स

पहिल्याच दिवशी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर खासदार डॉ. शिंदे भावूक

जिज्ञासू राहा, सतत शिकत राहण्याचा जेन झींना सल्ला

लंडन | ९ सप्टेंबर :
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान करणाऱ्या जगप्रसिद्ध ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मास्टर्स करणार आहेत. पहिल्याच दिवशी खासदार डॉ. शिंदे यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन खासदार ड़ॉ. शिंदे यांनी मास्टर्सच्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली. या अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करण्याचा संकल्प खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केला. (MP Dr. Shrikant Shinde to Pursue Master’s Degree from London School of Economics, the Prestigious Institution that Awarded Dr. Babasaheb Ambedkar His Doctorate)

खासदार डॉ. शिंदे हे लंडनमध्ये दाखल झाले असून त्यांचा TRIUM Global MBA या अभ्यासक्रमाला ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये सुरुवात झाली. यानिमित्ताने ‘एक्स’वर खासदार डॉ. शिंदे यांनी पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, इथं आल्यानंतर सर्वप्रथम कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणं, हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण होता. शतकभरापूर्वी, ज्या तरुणाला वर्गाबाहेर बसवले, तो नंतर याच संस्थेत आला, The Problem of the Rupee या प्रबंधासाठी डॉक्टरेट मिळवली आणि भारताला त्याचे संविधान व रिझर्व्ह बँकेच्या पायाभरणीसाठी मायदेशी परतला. त्याच शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेणं हे मी माझं भाग्य समजतो.

डॉ. आंबेडकर म्हणायचे की “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पितो तो गर्जना करतो”. त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर त्यांना नेमके काय म्हणायचे होते हे समजते. आज त्याच दालनामध्ये उभा असताना महाराष्ट्रातील एक खासदार असलो तरी सर्वप्रथम एक विद्यार्थी म्हणून अभिमानाने माझे ऊर भरुन आले. विचार व निर्धार किती दूरवर प्रवास करू शकतात याची आठवण झाली, अशी भावना खासदार डॉ. शिंदे यांनी एक्सवर व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, ही माझी दुसरी पदव्युत्तर पदवी आहे. एम.एस ऑर्थोपेडिक केल्यानंतर माझ्यासाठी वेगळ्याच जगाची दारे खुली झाली. वैद्यकशास्त्राने मला उपचार कसे करायचे हे शिकवले. आता गुंतागुंतीच्या आर्थिक प्रश्नांना आणि धोरणांना कसे सामोरे जायचे हे समजून घेण्यासाठी मी इथं प्रवेश घेतलाय. क्षेत्र वेगळे असले तरी जिज्ञासा मात्र तीच आहे. मला नेहमीच विद्यार्थी बनून राहायला आवडते आणि कधीही विद्यार्थी म्हणून थांबूच नये, अशी माझी इच्छा आहे. आता पुन्हा व्याख्याने, उत्साही गटचर्चा, कॉलेजच्या दिवसांची ती परिचित धावपळ, यावेळी अनुभवता येईल. हे शिक्षण माझ्या कामात, महाराष्ट्रात आणि माझ्या देशात परत आणण्यासाठी उत्सुक आहे.

तरुणांनो पदवी, नोकरी किंवा पद तुम्हाला तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे, असे कधीही मनात आणू नका. डॉ. आंबेडकरांचा विश्वास होता की “मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे”. जग कोणत्याही वर्गखोलीच्या गतीपेक्षा वेगाने बदलत आहे, म्हणून जिज्ञासू राहा आणि सतत शिकत राहा, असा सल्ला खासदार ड़ॉ. शिंदे यांनी जेन झींना दिला.
——-

Exit mobile version