Site icon LNN

गणेशोत्सवाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत महापालिकेकडून स्वच्छतेबाबत जनजागृती; नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

 

कल्याण डोंबिवली दि.5 सप्टेंबर :
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सुमित एल्कोप्लास्ट संस्थेच्या आय.ई.सी (Information, Education and Communication) टीमतर्फे शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. (Municipal Corporation creates awareness about cleanliness in Kalyan Dombivali through Ganeshotsav; Positive response from citizens)

या मोहिमेअंतर्गत आय.ई.सी टीमने कल्याण डोंबिवलीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यात गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट, परिसराची स्वच्छता राखण्याचे महत्त्व, ओला – सुका कचरा यांचे स्वतंत्र वर्गीकरण, वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्ये याबाबत पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे उपक्रम राबविल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळते आणि कचऱ्याचे योग्य नियोजन करणे सोपे जाते. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून देण्यात आली.

मुले, युवक आणि महिलांचा या जनजागृती मोहिमेत विशेष सहभाग दिसून आला. लहान मुलांनी मंडळाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची शपथ घेतली, तर काही महिलांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी घरीच स्वतंत्र डबे ठेवण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेत निश्चितच सुधारणा होईल, तसेच नागरिकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी त्यातून समाजहिताचे, पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले तर त्याचे दीर्घकालीन,चांगले परिणाम शहराच्या विकासावर होणार आहेत.

Exit mobile version