Home ठळक बातम्या दुर्गाडी किल्ल्याजवळ साकारले जाणार ‘नौदल संग्रहालय’; छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाणार मानवंदना

दुर्गाडी किल्ल्याजवळ साकारले जाणार ‘नौदल संग्रहालय’; छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाणार मानवंदना

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण दि.4 फेब्रुवारी :
कल्याण…एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन शहर. स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली होती. मात्र स्वराज्यातील या सुवर्णकाळाच्या पाऊलखुणा आज पुसल्या गेल्या असून हा सुवर्णकाळ पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी ‘नौदल संग्रहालय’ (naval museum) उभारण्यात येणार आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आपल्या प्रकारचे हे पहिलेच संग्रहालय असेल अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
खाडीकिनारी वसलेल्या कल्याण शहराला प्राचीन वारसा आणि ऐतिहासिक असे महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही खाडीकिनारी वसलेल्या कल्याणचे महत्व ओळखून याठिकाणी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्या सुवर्णकाळाच्या स्मृती जागवण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी हे ‘नौदल संग्रहालय’ साकारण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी भारतीय नौदलाला एक युद्धनौकाही देण्याची विनंती करण्यात आली आहे. या युद्धनौकेवर चालुक्य काळातील आरमार, मराठा आरमार आणि सध्याचे भारतीय नौदलाचा इतिहास म्युरलच्या (भित्तिचित्रांच्या) माध्यमातून रेखाटण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. अशाप्रकारचे हे देशातील बहुधा पहिलेच नौदल संग्रहालय असेल ज्यातून महाराजांच्या आरमाराचा इतिहास लोकांसमोर येण्यासह संरक्षण दलाबाबत नव्या पिढीमध्ये संरक्षण दलाबाबत जिज्ञासा निर्माण होईल असेही पालिकायुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे येत्या काळात ऐतिहासिक कल्याण शहराची नविन ओळख निर्माण होण्यासह शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळही या संग्रहालयाद्वारे उलगडला जाणार आहे. ही प्रत्येक नागरिकासाठी नक्कीच अभिमानाची बाब असेल, यात दुमत नाही.

(फोटो सौजन्य :- विकिपीडिया)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा