कल्याण डोंबिवली दि.30 मार्च :
शिक्षण विभाग, योजना कार्यालय पुणे यांच्या नियोजनानुसार दि. २९ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत विशेष परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परीक्षेसाठी तब्बल २०९ परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. (Navbharat Literacy Campaign: A New Dawn in Education; Special Examination Successfully Conducted Across Kalyan-Dombivli Municipal Area”)
“असाध्य ते साध्य करिता सायास” या उक्तीप्रमाणे, आयुष्याच्या एका टप्प्यावर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी ही परीक्षा म्हणजे स्वावलंबनाकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. या उपक्रमात १,२५५ नवसाक्षर नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये १,०५७ महिला आणि १९८ पुरुषांचा समावेश होता.
या परीक्षेमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या मूलभूत साक्षरतेवर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत, “शिकण्याला वयाची मर्यादा नसते” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.
परीक्षार्थ्यांचे शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच शाळांच्या फलकांवर नवसाक्षरांचे प्रेरणादायी संदेश झळकले. परीक्षेच्या वेळी उमेदवारांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.
परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व सूचना शिक्षण विभागामार्फत शाळांना सीआरसी प्रमुखांद्वारे पत्र आणि माहिती पुस्तिकांद्वारे देण्यात आल्या होत्या. परीक्षा कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही, आणि परीक्षा अत्यंत सुरळीत वातावरणात पार पडली.
ऑनलाईन कामकाजासाठी विलास लिखार सर, युवराज महाले सर, सरदार सर आणि संतोष पाटील सर यांनी विशेष योगदान दिले.
या अभियानाचा उद्देश केवळ वाचन-लेखनापुरता मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर बनवून मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. कल्याण-डोंबिवली मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला.
हा उपक्रम म्हणजे “साक्षर भारत, समर्थ भारत” या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक प्रेरणादायी आणि आश्वासक पाऊल आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व नवसाक्षर नागरिक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

