राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, यासाठी प्रार्थना
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते घटस्थापना; प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री. रवींद्रजी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न
सायंकाळी सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन
डोंबिवली | ११ ऑक्टोबर
राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळावा, शेतीला नवसंजीवनी लाभावी आणि महाराष्ट्रात सुख-समृद्धी नांदावी, या मंगल संकल्पनेतून डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग, पूजाविधी आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री. रवींद्रजी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक विधीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहभागी होत राज्यातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली. (Navkundatmak Sahasrachandi Maha Yagna in Dombivli for Farmers’ Prosperity and Well-being; Sharadiya Navratri Festival Inaugurated in the Presence of MP Dr. Shrikant Shinde)
राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, पर्जन्यमान चांगले होऊन शिवारात समृद्धी नांदावी आणि बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, या भावनेतून यंदाच्या नवरात्रोत्सवात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले होते. वैदिक मंत्रोच्चार, पूजाविधी आणि होमहवनाच्या माध्यमातून राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, शेतकरी बांधवांना संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, असा मंगल संकल्प या महायागाच्या निमित्ताने करण्यात आला.
याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधिवत पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तसेच सप्तशती पाठवाचनासह विविध धार्मिक विधी पार पडले. प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवाची सुरुवात श्रद्धा, भक्ती आणि मंगलमय वातावरणात झाली. देवीच्या आराधनेतून समाजात सकारात्मकता, एकोपा आणि समृद्धी नांदावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणाऱ्या या उत्सवात दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. मात्र, यंदा राज्यातील शेतकरी बांधवांच्या अडचणी आणि दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत दांडिया महोत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्याऐवजी यंदा धार्मिक विधी, महायाग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी करण्यात आलेला सहस्रचंडी महायाग हा यंदाच्या उत्सवाचा प्रमुख धार्मिक केंद्रबिंदू ठरला आहे.
११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित या नवरात्रोत्सवात देवीची महापूजा, सप्तशती पाठवाचन, होमहवन, आरती आणि महाप्रसाद यांसह विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय हरिपाठ, कीर्तन, भजन, महिला भजनी मंडळांचे सादरीकरण, लोककला आणि भक्तिसंगीताचे कार्यक्रमही होणार आहेत. भाविकांना देवीच्या आराधनेत सहभागी होता यावे, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
धार्मिक कार्यक्रमांबरोबरच संगीतप्रेमींसाठीही यंदा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, आज सायंकाळी सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीताच्या क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणामुळे उत्सवात सुरेल रंग भरले जाणार आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित हा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा संगम आहे. यंदा बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी करण्यात आलेल्या महायागातून शेतकरी बांधवांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. डोंबिवली आणि परिसरातील भाविक, नागरिक व संगीतप्रेमींनी या नवरात्रोत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
देवीच्या तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारा भव्य सभामंडप!
डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात आलेला आकर्षक सभामंडप यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे. देवीच्या पवित्र तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारी भव्य रचना, देवीच्या मनोहारी प्रतिमा, आकर्षक चित्रे आणि देखणी शिल्पे यांमुळे संपूर्ण परिसराला भक्तिमय आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे. कलात्मक सजावट आणि धार्मिक परंपरेचा सुरेख संगम साधणारा हा सभामंडप भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, येथे येणाऱ्या प्रत्येकाला देवीच्या दिव्य दर्शनासोबतच आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येत आहे.
आज सायंकाळी राहुल देशपांडे यांची सुरेल संगीत मैफल!
वेळ : सायंकाळी ७ वाजता | स्थळ : डी.एन.सी. शाळेचे मैदान, डोंबिवली पूर्व
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफल. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीताची सुरेल अनुभूती देणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित या मैफलीचा संगीतप्रेमींनी आवर्जून आनंद घ्यावा.

