Home ठळक बातम्या बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थिनी ठेवणार कल्याणचा गणेशघाट चकाचक

बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थिनी ठेवणार कल्याणचा गणेशघाट चकाचक

 

कल्याणात प्रथमच राबवले जातेय ‘पुनीत सागर’ अभियान

केतन बेटावदकर,

कल्याण दि.16 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली शहरांना नैसर्गिक असा खाडी किनारा लाभला असला तरी इथे उभारण्यात आलेल्या गणेश घाटाची गेल्या काही वर्षांत प्रचंड दुरावस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून कल्याणातील नामांकित बिर्ला महाविद्यालय पुढे आले आहे. या महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थीनींनी कल्याणचा गणेश घाट स्वच्छ राखण्याचा विडा उचलला आहे.

कल्याण शहर हे पुण्यानंतर असे एकमेव शहर आहे ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे. महत्वाच्या नद्यांचा संगम आणि त्यासोबतच लाभलेला विस्तीर्ण खाडीकिनारा अशी नैसर्गिक देणगी कल्याणला लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पहिले आरमार या कल्याणच्या बंदर परिसरात उभारले. यावरूनच त्याकाळातील आणि त्यापूर्वीच्या प्राचीन काळातील दस्तऐवजात कल्याणच्या या बंदराचे दाखले सापडतात. एवढा मोठा सांस्कृतिक वारसा लाभूनही त्याची म्हणावी तेवढी देखभाल किंवा निगा राखली गेली नाही ही शोकांतिका आहे.
या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी पुढाकार घेत याबाबत कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाशी संपर्क साधला. त्याला बिर्ला महाविद्यालयाच्या वन महाराष्ट्र ध्वज बटालियन एनसीसीच्या ग्रुप कॅप्टन सुवर्णा जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुनीत सागर अभियान राबवले जात आहे. त्या अभियानाच्या धर्तीवर कल्याणच्या या गणेश घाट परिसरात बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीच्या या विद्यार्थिनींनी स्वछतेची जबाबदारी घेतल्याची माहिती ग्रुप कॅप्टन सुवर्णा जाधव यांनी दिली.

तर जोपर्यंत हा गणेश घाट संपूर्ण स्वच्छ होत नाही तोपर्यंत दररोज सकाळी 6 ते 6.30 असा अर्धा तास या एनसीसीच्या विद्यार्थिनी याठिकाणी येऊन निर्माल्य, कचरा आदींचे वर्गीकरण करतील, अशी माहिती उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. तर याठिकाणी येणाऱ्या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कल्याणच्या गणेश घाट परिसरातून हा उपक्रम सुरू झाला असून लवकरच डोंबिवलीतील गणेश घाटावर तो राबवणार असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी केडीएमसी उपायुक्त कोकरे यांनी स्वतः कचऱ्यात उतरत एनसीसी विद्यार्थिनींच्या मदतीने निर्माल्य आणि प्लॅस्टिक वेगळे केले. आता नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सुजाणपणा दाखवला पाहीजे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा