Site icon LNN

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नागरी समस्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे पाहणी; पार्किंग, स्वच्छतेसह प्रसाधनगृहांच्या सुविधांकडे वेधले लक्ष

प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि रिक्षाचालकांच्या समस्या घेतल्या जाणून

कल्याण | २५ ऑक्टोबर
बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नागरी समस्या आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने करण्यात आली. पक्षाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख तथा प्रवक्ते महेश तपासे यांनी रेल्वे स्थानक परिसराला भेट देत विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांमध्ये सुसंवाद राहण्याच्या दृष्टीने चर्चा केली. (NCP (Sharad Pawar Faction) Inspects Civic Issues at Kalyan Railway Station, Flags Concerns Over Parking, Cleanliness and Toilet Facilities)

काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. या पार्श्वभूमीवर महेश तपासे यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस आणि रेल्वे वाहतूक पोलिसांची भेट घेऊन स्थानक परिसरातील परिस्थिती तसेच प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली.

पार्किंग, स्वच्छता आणि प्रसाधनगृहांचा प्रश्न ऐरणीवर…
या पाहणी दौऱ्यादरम्यान रिक्षाचालकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे महेश तपासे यांचे लक्ष वेधले. रेल्वे स्थानक परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न, अस्वच्छता आणि प्रसाधनगृहांच्या सुविधांचा अभाव यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्यांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता राखणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

रेल्वेच्या आपत्कालीन रुग्णालयाचीही पाहणी…
महेश तपासे यांनी रेल्वेच्या आपत्कालीन रुग्णालयालाही भेट दिली. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतानाच रुग्ण नोंदणी रजिस्टर आणि तक्रारींच्या नोंदींची पाहणी करण्यात आली. रुग्णांना वेळेत आणि योग्य वैद्यकीय सुविधा मिळतात का, याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार…
रेल्वे स्थानक परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच काही कालावधीनंतर पुन्हा रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे प्रमोद निमेश, बजरंग तांगडकर, वंदना जाधव, सीमा आहुजा, ॲड. शेखर वाकोडे, आकाश जाधव, ॲड. राहुल रामटेके, विजय बोरे, भानुदास घुगे, अनिल जगताप, रवींद्र बिडलान, इमरान खान, अभिजीत बागुल, अखिफ खांडे आणि इमरान बेग यांच्यासह कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version