Home क्राइम वॉच वनविभागाच्या 13 कोटी वृक्षलागवडीचे थर्डपार्टी ऑडिट करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

वनविभागाच्या 13 कोटी वृक्षलागवडीचे थर्डपार्टी ऑडिट करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

अंबरनाथ दि.16 नोव्हेंबर :
राज्य सरकारने गाजावाजा करून राज्यात १३ कोटी वृक्षलागवड केली खरी, मात्र वन विभागाने ही झाडं जगवली आहेत का? असा संतप्त सवाल सत्ताधारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कल्याणजवळच्या नेवाळी परिसरातील डोंगरावर लावलेल्या एक लाख झाडांची अज्ञात समाजकंटकांनी जाळपोळ केली. त्याची पाहणी केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना खासदार शिंदेंनी हा सवाल उपस्थित केला आहे.

नेवाळीतील मांगरूळच्या डोंगरावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून सरकारच्या एक कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत एक लाख झाडांची लागवड केली होती. यानंतर काही दिवसात या झाडांना आग लावण्यात आली होती. मात्र त्यावेळी वनविभागाने ही झाडं वाचवली. परंतू पुन्हा एकदा असाच प्रकार घडला असून त्यात झाडं लावलेल्या दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या झाडांची आज खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहणी करत उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी चांगलीच आगपाखड केली. सगळ्या सुविधा देऊनही वनविभाग जर इथली झाडं जगवू शकत नसेल, तर राज्यात लावलेली १३ कोटी झाडं खरोखर जगली असतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोबतच या १३ कोटी वृक्षलागवडीचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणीही केली.

खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच खासदाराने सरकारच्या योजनेवर अशाप्रकारे संशय व्यक्त केल्याने या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या झाडं जालन्याच्या घटनेसह अवनी वाघाचे मृत्यू प्रकरण हे दोन्ही विषय येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*