Home ठळक बातम्या पत्रीपुलासाठी आता नविन डेडलाईन; 8 महिन्यात नविन पूल बांधणार – पालकमंत्री एकनाथ...

पत्रीपुलासाठी आता नविन डेडलाईन; 8 महिन्यात नविन पूल बांधणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण दि.30 डिसेंबर :,
नविन पत्रीपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीच्या फोडण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणारा नविन पत्रीपुल अवघ्या 8 महिन्यात बांधून पूर्ण होईल अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरण आणि नविन पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कल्याण डोंबिवलीकरता पत्रीपूल अत्यंत महत्वाचा असून तो लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्याच्या कामामुळे या भागातील लोकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र हा मार्ग सहापदरी झाल्यानंतर अडचण दूर होणार असून 8 महिन्यात पत्रीपुल बांधून पूर्ण होईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा अनुभव असणाऱ्या एमएसआरडीसीने त्याहीपेक्षा कमी वेळेत हा पूल बांधण्याचा प्रयत्न करावा. एक आव्हान म्हणून एमएसआरडीसीने ते स्विकारलं पाहिजे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

तर गेल्या 10-15 वर्षांत एमएसआरडीसी याचे नामोनिशाण गायब झाले होते. मात्र उद्धव साहेबांनी हे खाते आपल्याकडे दिले आणि आपण या खात्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. मुंबई पुणे प्रमाणे नागपूर मुंबई हे अंतर 15 तासांवरून सहा तासांवर येणार असून राज्यातील 10 जिल्हे आणि सर्व विभाग त्याद्वारे जोडले जाणार आहेत. तसेच ठाणे बोरिवली दरम्यान एक टनेल बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्यातून 2 तासाचे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापले जाईल असे ते म्हणाले.

तर आपल्या भाषणात पालकमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना कानपिचक्या दिलेल्या पाहायला मिळाल्या. ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतही स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यासाठी प्रशासन आणि नगरसेवकांनी एकत्रिपणे काम करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, गटनेते दशरथ घाडीगांवकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर, शिवसेना नेते रवी पाटील, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*