कल्याण | दि. २५ जुलै:
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर, मुंबईच्या एकूण ४९ शाळांपैकी न्यू हायस्कूल – कनिष्ठ महाविद्यालय, जोशीबाग, कल्याण (पश्चिम) या शाळेला प्रथमच शालेय बस मिळाल्याचा मान मिळाला आहे. ही बस संस्थेचे माजी विद्यार्थी, सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे आणि संयम बागडे यांनी त्यांच्या देणगीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. (New High School Receives Bus Donation Through Cooperation of Former Student MLA Jaganath (Appa) Shinde and Sanyam Bagde)
या शालेय बसच्या लोकार्पण आणि कृतज्ञता समारंभाचे आयोजन शुक्रवारी, दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता मा. आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या कल्याण (पूर्व) येथील निवासस्थानी करण्यात आले.
कार्यक्रमास न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश घोलप, शालेय समितीचे अध्यक्ष प्रदीप गोसावी, संचालक मंडळ सदस्य अशोक साळी, राधाकृष्ण पाठक, माजी प्राचार्या ज्योती लोहार, माजी प्राचार्य सुधाकर खैरे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातृशाळेप्रती असलेल्या जिव्हाळा, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी केलेले हे दातृत्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण प्रवासासाठी मोलाचे ठरणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू तसेच दूरवरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
प्राचार्य सतीश घोलप यांनी या उदात्त योगदानाबद्दल आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे व संयम बागडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षणासाठी केलेले हे दातृत्व भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

