Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीकरांनो बसा बोंबलत; नविन पत्रीपुल अजून 1 वर्ष तरी होणार नाही

कल्याण डोंबिवलीकरांनो बसा बोंबलत; नविन पत्रीपुल अजून 1 वर्ष तरी होणार नाही

कल्याण दि.22 डिसेंबर :
गेल्या 4 महिन्यांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीच्या नरकयातना भोगणाऱ्या कल्याणकरांनो आणखी एक वर्ष तरी या शापातून तुमची सुटका होणे शक्य नाहीये. कारण पत्रीपुलाच्या बांधकामाला आणखी किमान 1 वर्षाचा कालावधी लागणार असल्याची कबुली दुसऱ्या कोणी नव्हे तर दस्तुरखुद्द एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनो ‘पत्रीपुलाचे काम आम्ही युद्ध पातळीवर पूर्ण करू, पुढील 3 महिन्यात पत्रीपुल बांधून होईल’ या झालेल्या घोषणा म्हणजे पोकळ आश्वासने ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

कल्याण पश्चिमेचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी आज एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत या पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी हा पूल बांधून पूर्ण होण्यास किमान 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवलीच्या दृष्टीने या पत्रीपुलाचे काय महत्व आहे? तो बंद असल्याने कोणाला किती टोकाचा त्रास होतोय? याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीनाही आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही. मात्र लोकांच्या त्रासाची दखल घेऊन त्यांना दिलासा देणारे काम केले तर मग ते सरकार कुठले. हा समज आणि लोकांमधील ही प्रतिमा कायम राहील याची पुरेपूर दक्षता लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी घेत असल्याचेच या पुलाच्या कामावरून अधोरेखित झाले आहे.

रेल्वेकडून परवानग्या मिळाल्या नाही तर हे बांधकाम रखडण्याची आणि सर्व परवानग्या मिळाल्यानंतरही किमान 10 ते 12 महिने लागतील अशी माहिती या एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र पवार यांना दिली. मग यापूर्वी या पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ‘युद्धपातळीवर हा पूल बांधण्याचे किंवा 3 महिन्यात नवीन पूल उभारण्याची पोकळ आश्वासने कोणत्या आधारावर आणि का देण्यात आली?

तर आपण स्वतः आणि खासदार कपिल पाटील जातीने लक्ष घालून रेल्वेच्या आणि इतर तांत्रिक परवानग्या मिळवून आणू आणि लोकांचा त्रास कमी करू असे आश्वासन यावेळी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी दिले. त्यावर लोकांनी का आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा ? असा प्रश्न याआधीच्या पोकळ आश्वासनाच्या अनुभवावरून निर्माण होणे स्वाभाविक आहे. तर कल्याण मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमावरून स्थानिक आमदार पवार हे सोशल मीडियावर टिकेचे धनी ठरले होते. आमदार महोदय ‘मेट्रोचे नंतर बघा आधी पत्रीपुल आणि दुर्गाडी पुलाचे काम पूर्ण करा’ या आशयाच्या अनेक तिखट कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. त्याची दखल घेत पवार यांनी पत्रीपुलाच्या कामाचा हा पाहणी दौरा केल्याची चर्चा आहे.

असो. कल्याण डोंबिवलीकरांनो थोडक्यात काय तर लोकप्रतिनिधी असो की प्रशासन दोन्ही बाजूकडून आपला मानसिक आणि भावनिक खेळ सुरू आहे, एवढे मात्र या आश्वासनांच्या अनुभवानंतर निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*