Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक कोंडी फोडण्यावर भर – दिपेश म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक कोंडी फोडण्यावर भर – दिपेश म्हात्रे

कल्‍याण, दि.3 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीला लागलेला अस्वच्छतेचा डाग पुसण्याबरोबरच आरोग्य आणि वाहतूक कोंडी फोडण्यावर आपला अधिक भर असेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिली. सभापतीपदी निवड झाल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. मुंबई उपनगरचे जिल्‍हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक कार्यक्रम पार पडला. दिपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा कुर्वे यांनी केली.

कल्याण डोंबिवलीसह २७ गावांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. प्रमुख अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली आहे. यामुळे स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर आपला अधिक भर असेल. तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीही आपले विशेष प्रयत्न असतील. तसेच स्थायी समिती सदस्यत्वचा राजीनामा दिलेल्या नाराज शिवसेना नगरसेवकांची समजूत काढली जाईल आणि नाराजीही दूर केली जाईल असे आश्वासनही दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिले.

दरम्यान स्थायी सभापतीपदासाठी शिवसेनेचे दिपेश म्हात्रे यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचे शिवसेना आमदार सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनिता राणे, सभागृह नेते श्रयेस समेळ, गटनेते दशरथ घाडीगावकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

…नाहीतर त्या दोन नगरसेवकांबाबत संघटनापद्धतीनुसार निर्णय घेऊ – गोपाळ लांडगे

संघटनेत प्रत्येकाला संधी दिली जाते. स्थायी सदस्यपदाचा राजीनामा दिलेल्या नगरसवेकांना समज देण्यात येत आहे. अन्यथा त्या दोन नगरसेवकांबाबत संघटनापद्धतीनुसार निर्णय घेतला जाईल असा थेट इशाराच शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला आहे. स्थायी समिती सभापती पदावरुन कल्याणातील शिवसेनेच्या गणेश कोट आणि जयवंत भोईर या नाराज नगरसेवकांनी थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी लांडगे यांना विचारले असता त्यांनी हा इशारा दिला आहे. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश येईल असेही त्यांनी नंतर सांगितले असले तरी या राजीनामानाट्याचा पुढचा अंक आता काय असणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*