Home क्राइम वॉच कल्याणात डॉक्टरने क्रूरतेने डांबून ठेवलेल्या 9 परदेशी कुत्र्यांची सुटका

कल्याणात डॉक्टरने क्रूरतेने डांबून ठेवलेल्या 9 परदेशी कुत्र्यांची सुटका

कल्याण दि.21 जून :
माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल या उच्चभ्रू परिसरातून समोर आली आहे. परदेशी जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत डांबून ठेवणाऱ्या डॉक्टरवर खडकपाडा पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कल्याणची उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर विरेंद्रपाल सिंग याचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती वाशीतील एनजीओचे कार्यकर्ते चेतन रामानंद शर्मा यांना मिळाली होती. चेतन शर्मा यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बंगल्यात जाऊन पाहणी केली. त्यावेळी समोरचे दृश्य पाहून सर्वानाच धक्का बसला. अत्यंत देखणे आणि सर्वात महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे (फॉरेन ब्रीड) 9 कुत्रे अत्यंत हलाखीच्या आणि मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. गेल्या कित्येक दिवसांपासून या कुत्र्यांना अत्यंत अपुऱ्या जागेत आणि अन्नविना ठेवण्यात आल्याचे त्यांच्या परिस्थितीवरून दिसून आले. तर काही कुत्रे भुकेपोटी आपलीच विष्ठा खात असल्याचे आढळून आल्याची माहिती चेतन शर्मा यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

या सर्व कुत्र्यांची बंगल्यातून सुटका करून त्यांना काही वेळ खडकपाडा पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर तातडीने औषधोपचार आवश्यक असल्याने या सर्वांना चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात हलवण्यात येत आहे. सुटका करण्यात आलेल्या या कुत्र्यांमध्ये 3 सायबेरीयन हस्की,1 डोंगो अर्जेंटिनो, 1सेंट बर्नार्ड, 3 गोल्डन रेटव्हीवर,1 फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या एका कुत्र्याच्या पिल्लाची किंमतच सुमारे 70 हजारांच्या घरात असल्याची माहिती प्राणीमित्राने दिली. विरेंद्रपाल सिंग हा या कुत्र्यांचे ब्रीडिंग करून त्यातून लाखो रुपये कमवत असल्याची शक्यता प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*