Home कोरोना कोवीड काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिला अधिकाऱ्यांचा ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे प्रातिनिधिक सत्कार

कोवीड काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिला अधिकाऱ्यांचा ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे प्रातिनिधिक सत्कार

कल्याण /डोंबिवली दि. 10 मार्च :

कोवीडसारख्या अतिकठीण प्रसंगातही न डगमगता काम केलेल्या केडीएमसीच्या 7 महिला अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. निमित्त होते ते जागतिक महिला दिन आणि कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या झालेल्या शासकीय नोंदणीचे. कल्याण डोंबिवलीतील नामांकित पत्रकारांच्या ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’तर्फे पुढाकार घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत हा छोटेखानी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कोरोनाने आपल्या सर्वांना भरपूर काही शिकवले. कठीण काळातच आपल्याला लोकांची आणि त्यांच्यातील खंबीरपणाची प्रचिती येते असं म्हटलं जाते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी. कोरोनाच्या आव्हानात्मक काळामध्ये या सर्वांनी निभावलेल्या जबाबदारीचे कौतुक करण्यासह त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ .प्रतिभा पानपाटील, रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ. प्रज्ञा टिके, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ.सुहासिनी बडेकर,
पाटकर आरोग्य केंद्र प्रमुख डाॕ.अनुपमा साळवे आणि माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे या 7 महिला अधिकाऱ्यांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर एक टिमलीडर म्हणून कोरोनाचे आव्हान अत्यंत यशस्वीपणे थोपवून धरणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचाही निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर कोरोनावर यशस्वीपणे मात करून पुन्हा त्याच जोमाने पत्रकारितेचे आव्हान पेलणाऱ्या झी 24 तासच्या आतिश भोईर, महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्निल शेजवळ आणि पुढारीच्या शुभम साळुंखे यांचाही महापालिका आयुक्तांकडून विशेष गौरव करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून हा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कल्याण डोंबिवलीतील नामांकित पत्रकरांनी एकत्र येत ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन कल्याण डोंबिवलीची (कल्याण डोंबिवली जर्नलिस्ट असोसिएशन अंतर्गत) स्थापना केली आहे. या पत्रकार संघटनेची नुकतीच शासकीय नोंदणी झाली असून त्याचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

याप्रसंगी निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर पगारे, खजिनदार आतिष भोईर, सचिव केतन बेटावदकर यांच्यासह प्रशांत माने, प्रदीप भणगे, मयुरी चव्हाण-काकडे, संजीत वायंगणकर, स्वप्निल शेजवळ, शुभम साळुंखे, प्रथमेश वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा