स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ५० शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप; समाजासमोर ठेवला विधायक वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श
कल्याण | १६ ऑक्टोबर :
हल्ली वाढदिवस म्हटला की केक कापणे, हॉटेलमध्ये जेवण, जंगी सेलिब्रेशन आणि जोरदार पार्टी, अशी पद्धत रूढ झाली आहे. मात्र, या दिखाऊ आनंदाला छेद देत कल्याणातील एमकेएस वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वाघ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला. स्वतःच्या आनंदाचा क्षण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी समर्पित करत प्राचार्य वाघ यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ५० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांच्या ४०० प्रेरणादायी पुस्तकांच्या मोफत वाटपाचा उपक्रम राबवत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे. (No Birthday Cake, but Inspirational Books on Great Leaders for Students! Kalyan College Principal Celebrates Birthday with a Unique Social Initiative)
मोहिंदरसिंह काबुलसिंह वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एम. वाघ यांच्या पुढाकाराने शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील महानगरपालिका शाळा क्रमांक १२ मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, खडकपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रविण बाखले, केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे, एमकेएस चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव परमजित सिंग सैनी, माजी नगरसेविका पुष्पा भोईर, शाळेच्या मुख्याध्यापिका सपना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अपयशातून शिकून पुन्हा उभे कसे राहावे, याची शिकवण पुस्तकांमधून – अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत…
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुलांमध्ये वाचनाची सवय टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडणे, त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करणे आणि वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित करणे, ही काळाची गरज असल्याचे सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
प्रत्येक शाळेमध्ये एक तास वाचनाचा उपक्रम – प्रशासन अधिकारी विजय सरकटे
मोबाईल असेल, इंटरनेट असेल, टीव्ही असेल यातून आपले विद्यार्थी काय बाहेर पडत नाही आणि म्हणून शासनाने वेगवेगळे असे उपक्रम हाती घेतले आहेत. वाचनाकडे त्यांचा कल वाढला पाहिजे म्हणून तो वळवण्यासाठी विविध असे उपक्रम केडीएमसी शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल सर यांच्या प्रेरणेतून दर शुक्रवारी महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक तास वाचनाचा उपक्रम सुरू केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सरकटे यांनी सांगितले.
केडीएमसी शाळेमध्ये सामान्य मुलं शिकतात आणि या सामान्य मुलांमध्ये असामान्य व्यक्तिमत्व दडलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना प्रेरणादायी विचारांची ओळख करून देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तसेच प्रेरणादायी पुस्तके ही केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करणारे माध्यम आहेत. संघर्षातून मार्ग कसा काढावा, अपयशातून शिकून पुन्हा उभे कसे राहावे, ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न कसे करावेत, याची शिकवण पुस्तकांमधून मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केक कापून वाढदिवसाचा आनंद काही क्षणांत संपतो; मात्र विद्यार्थ्यांच्या हाती दिलेले पुस्तक त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम केवळ पुस्तकवाटपापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा आणि समाजात विधायक कार्याची प्रेरणा निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमधूनच सामाजिक बांधिलकी जपणारी आणि शिक्षणाला प्राधान्य देणारी समाजव्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

