Site icon LNN

कोणीही माई का लाल, लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवलीतील विविध विकासकामांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण – भूमीपूजन

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीचेही उपमुख्यमंत्र्याकडून कौतुक

डोंबिवली दि.6 डिसेंबर :
लाडकी बहीण योजना ही आपली सर्वात लाडकी योजना असून कोणीही माई का लाल आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ठाम ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीत दिली. डोंबिवलीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे भूमीपूजन तर केडीएमसीकडून विकसित करण्यात आलेल्या अतिशय सुंदर अशा युद्ध स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही देण्यासह कल्याण लोकसभेमध्ये सुरू असलेल्या अनेक विकासकामांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. (No One Can Shut Down the Ladki Bahin Yojana” – Deputy Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आपल्याला अनेक प्रकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपण स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. एकीकडे विकासकामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशा पध्दतीने आपण राज्याला विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपली सर्वात लाडकी योजना असून आयुष्यात अनेक लहान – मोठी पदं येतात आणि जातात. मात्र राज्यातील करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सर्वात मोठी असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. आमच्या कुटुंबात आम्ही गरिबी पाहिली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री झालो आणि लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुसरी इनिंग सुरू असून केंद्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर आम्ही राज्यात सर्वच क्षेत्रात गतिमान विकास साकारत आहोत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामाचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक…
कल्याण लोकसभा मतदारसंघात आज अतिशय मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि इतर विकासाची कामे सुरू आहेत. तुम्ही अत्यंत योग्य व्यक्ती खासदार म्हणून निवडून दिला आहे. त्याच्या कामाचा आणि कार्यपद्धतीचा आपल्याला खूपच अभिमान असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच
तुमच्या खासदाराकडे विकासाचे व्हिजन आहे, म्हणून ते कधीही रिजन देत नाही. नो रिजन, ऑन द स्पॉट डिसिजन असा तुमचा खासदार आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version