Site icon LNN

“स्वतःच्या नव्हे, तर शहराच्या विकासासाठी काम करा…”; कल्याण डोंबिवलीकरांचा नव्या लोकप्रतिनिधींना स्पष्ट संदेश

कल्याण-डोंबिवली, दि. 19 जानेवारी :
कल्याण-डोंबिवलीमध्ये निवडून आलेल्या नव्या लोकप्रतिनिधी, अर्थात नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन. अखेर नगरसेवक बनण्याचे तुमचे स्वप्न साकार झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना आता कायदेशीर आणि अधिकृतरीत्या लोकाश्रय प्राप्त झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील मतदारांच्या भाषेत सांगायचे झाले, तर “आम्ही आमचे कर्तव्य चोख बजावले आहे. आता तुम्ही स्वतःसाठी नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी काम केले पाहिजे,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश नागरिक देत आहेत. (not-for-self-but-for-the-citys-development-clear-message-from-kalyan-dombivli-voters-to-new-representatives)

तुमचे पक्ष वेगवेगळे असतील, पक्षांच्या विचारधारा भिन्न असतील, विरोधी वा मित्रपक्षांशी मतभेद असतील—मात्र मतदारांना या अंतर्गत राजकारणाशी कोणतेही देणेघेणे नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरच नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. या आश्वासनांचा विसर पडू नये, अन्यथा त्याचे परिणाम काय होऊ शकतात, हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारातून मतदारांनी काही प्रतिनिधींना ठाम संदेश दिला आहे, याची जाणीव सर्वांनाच असणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीकरांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा, नागरी नियोजन अशा अनेक समस्या सर्वांनाच माहीत आहेत. हे प्रश्न सोडवताना पक्षीय राजकारण, वैयक्तिक मतभेद किंवा विरोधासाठी विरोध करणारी भूमिका अडथळा ठरू नये, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. (LNN)

या निवडणुकीत अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, तर काही अनुभवी नगरसेवकांची ही दुसरी, तिसरी किंवा चौथी टर्म आहे. नव्या नगरसेवकांच्या ताज्या कल्पनांना अनुभवी नगरसेवकांच्या प्रशासकीय जाणिवांची साथ मिळाल्यास शहर विकास आणि शहर नियोजनाला निश्चितच दिशा मिळू शकते. याच उद्देशाने कल्याण-डोंबिवलीकरांनी आपले प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवले आहेत, हे विसरता कामा नये.

प्रचारादरम्यान ‘आम्हाला मत म्हणजे विकासाला मत’ आणि ‘शहराच्या प्रगतीला मत’ अशा घोषणा वारंवार देण्यात आल्या. आता त्या घोषणांना कृतीची जोड देण्याची वेळ आली आहे. हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर तसेच येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्यांचा त्रास सहन करत आहेत. ही परिस्थिती आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे.

म्हणूनच, कोणतेही राजकारण किंवा हेवेदावे बाजूला ठेवून शहर विकास आणि शहर नियोजनाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तसे झाले, तर पुढील निवडणुकांमध्ये हाच मतदारराजा तितक्याच खंबीरपणे लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभा राहील, याची जाणीव नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून सर्वांनाच झाली असेल.(LNN)

आता वाट कसली बघायची?
चला, कामाला लागा…

©️ – Local News Network (LNN)

Exit mobile version