Home ठळक बातम्या क्या बात है : सीबीएसईच्या अभ्यासक्रमात आता केडीएमसी अधिकाऱ्याचा धडा

क्या बात है : सीबीएसईच्या अभ्यासक्रमात आता केडीएमसी अधिकाऱ्याचा धडा

 

कल्याण दि.7 फेब्रुवारी :
डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा धडाडीच्या प्रयत्नासह ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणाऱ्या केडीएमसीच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याच्या कामाची दखल थेट सीबीएसई (सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन)ने घेतली आहे. सीबीएसईच्या 6वीच्या पुस्तकात रामदास कोकरे यांच्यावरील धड्याचा समावेश करण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विद्यमान उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी असताना वेंगुर्ला परिसरात शून्य कचरा मोहिमेबाबत भरीव काम केले. त्यांच्या या कामाची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली असून इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात या विषयाबाबतच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. याशिवाय कर्जत, माथेरानमध्ये देखील रामदास कोकरे यांनी वेंगुर्ला प्रमाणे कचरा विरहित शहर आणि डंपिंग ग्राउंड विकसित केले आहे. माथेरान नगरपरिषदने त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून एका रस्त्याला “मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग ” असे नावही दिले आहे. स्वच्छतेबाबत कमालीचे शिस्तप्रिय, सजग आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे कोकरे यांनी आतापर्यंतच्या शासकीय सेवेत 30 कोटी रु.हून अधिक रक्कम बक्षीस रूपाने विविध शहरांना प्राप्त करून दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू झाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना साथ ऐन भरात असतानाही उपायुक्त रामदास कोकरे यांनी शून्य कचरा मोहिमेचा प्रारंभ करत कल्याण डोंबिवलीची कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. तर रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात सीईओ म्हणून कार्यरत असताना राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल शासनाने घेत वेंगुर्ले पॅटर्नच्या धड्याचा समावेश सीबीएससी अभ्यासक्रमात केला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीला स्वच्छ शहरं करण्यासाठी अविश्रांत कार्यरत असणाऱ्या रामदास कोकरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा