महापालिका अधिकारी स्वखर्चाने करणार कार्यालयांचा कायापालट
कल्याण – डोंबिवली दि. २६ सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली शहरांपाठोपाठ आता आपली कार्यालयेही स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केडीएमसीने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता अभियानांतर्गत माझे कार्यालय – स्वच्छ कार्यालय हा स्पर्धात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतला आहे.
येत्या १ ऑक्टोबर रोजी कल्याण डोंबिवली महापालिका आपला ३९ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने ही माझे कार्यालय स्वच्छ कार्यालय स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी झाले असून ते आपापल्या कार्यालयात स्वखर्चाने हा उपक्रम राबवणार असल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले. आजपासून सुरू झालेला हा उपक्रम महापालिका वर्धापन दिनापर्यंत चालणार आहे. त्यामध्ये विजयी झालेल्या अधिकाऱ्याचा वर्धापन दिन सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे.
आपल्या कार्यालयात असणाऱ्या अनावश्यक वस्तू काढून टाकून ते मोकळे करणे आणि कार्यालयातील सर्व फायली अभिलेख कक्षात लावून अभ्यागतांसाठी पुरेशी जागा निर्माण होणे हे प्रमूख उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर या संकल्पनेनुसार महापालिका मुख्यालयातील उद्यान विभाग, विद्युत विभाग आदी कार्यालयाच्या प्रमुखांनी या कार्यालयांमध्ये चांगलाच बदल केलेला दिसून येत आहे.
दरम्यान केडीएमसी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. या कायापालट अभियानातून केडीएमसीची कार्यालये सुंदर तर व्हावीच पण त्याचसोबत केडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या मनामध्ये या शहरांप्रती असणारी मरगळही झटकली जाईल आणि जेणेकरून या संकल्पनेचे प्रतिबिंब कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणात उमटेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी.