Site icon LNN

नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी ‘ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे’ अभिनव उपक्रम ; अधिकृत संपर्क क्रमांक आणि संकेतस्थळ सुरू

– नागरिकांना समस्या, सूचना व तक्रारी थेट मांडता येणार

– नागरिकांना 93765 67567 या संपर्क क्रमांकावर मांडता येणार सूचना आणि समस्या

कल्याण, दि. २१ सप्टेंबर :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या, सूचना, तक्रारी तसेच प्रलंबित प्रश्न थेट मांडता यावेत आणि त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रभावी माध्यम उपलब्ध व्हावे, यासाठी *‘ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे’* च्या माध्यमातून अधिकृत संपर्क व्यवस्था आणि संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना या 93765 67567 संपर्क क्रमांकावर तसेच https://officedrshrikantshinde.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या सूचना, समस्या मांडता येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या कार्यालयापर्यंत पोहोचवता येणार असून, संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या विभागांशी समन्वय साधून कार्यवाही केली जाणार आहे. (‘Office of Dr. Shrikant Shinde’ an Innovative Initiative to Connect Directly with Citizens; Official Contact Number and Website Now Live)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यावर भर देत आहेत. नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता याव्यात यासाठी वेळोवेळी मतदारसंघातील विविध शहरांमध्ये ‘खासदार आपल्या भेटीला’, ‘जनता दरबार’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जातो. या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रश्नांची माहिती घेऊन संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि यंत्रणांशी समन्वय साधत त्यावर कार्यवाही केली जाते.

अनेक वेळा एखाद्या नागरिकाचा प्रश्न स्थानिक प्रशासन, शासकीय विभाग, महापालिका, नगरपालिका किंवा इतर सार्वजनिक यंत्रणांशी संबंधित असतो. काही प्रश्न प्रलंबित असतात, तर काही बाबतीत नागरिकांना योग्य मार्गदर्शन किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्काची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना घरबसल्या किंवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार थेट संपर्क साधता यावा, या उद्देशाने ‘ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे’च्या माध्यमातून ही अधिकृत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या परिसरातील नागरी समस्या, रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, सार्वजनिक सुविधा, शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित कामे, विविध विभागांशी संबंधित तक्रारी, सूचना तसेच सार्वजनिक हिताच्या बाबी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देता येणार आहेत.

नागरिकांनी आपली समस्या मांडताना आवश्यक ती माहिती, संबंधित कागदपत्रे किंवा उपलब्ध असल्यास समस्या स्पष्ट करणारे फोटो अथवा इतर तपशील सादर केल्यास संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास अधिक सुलभता होणार आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांची माहिती घेऊन त्यानुसार संबंधित विभाग अथवा यंत्रणेशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच एखाद्या नागरिकाला विशिष्ट प्रकरणात मदत, मार्गदर्शन किंवा प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता असल्यास, त्यानुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही कार्यालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

समस्यांच्या निराकरणाच्या प्रक्रियेचा आढावा
नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर केवळ निवेदन स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित प्रकरणाचा आवश्यकतेनुसार पाठपुरावा करण्यावर भर दिला जाणार आहे. कोणत्या विभागाकडे समस्या प्रलंबित आहे, त्यावर कोणती कार्यवाही आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणत्या स्तरावर समन्वयाची गरज आहे, यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार असून, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीबरोबरच आता डिजिटल आणि दूरध्वनी माध्यमातूनही नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याचे अधिकृत माध्यम उपलब्ध झाले आहे.

‘संवाद – समन्वय – सेवा’
‘संवाद – समन्वय – सेवा’ या भूमिकेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक सुलभ करणे हा आहे. मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता भासू नये, तसेच त्यांच्या प्रश्नांची माहिती योग्य त्या माध्यमातून संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या, सूचना आणि तक्रारी मांडण्यासाठी थेट, सुलभ आणि अधिकृत संपर्काचे माध्यम उपलब्ध होणार आहे.

:- नागरिकांसाठी अधिकृत संपर्क :-
संपर्क क्रमांक : +91 93765 67567
संपर्काची वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
अधिकृत संकेतस्थळ : https://officedrshrikantshinde.com

नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना अथवा तक्रारी अधिकृत संपर्क माध्यमातून कार्यालयापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन ‘ऑफिस ऑफ डॉ. श्रीकांत शिंदे’च्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version