Home ठळक बातम्या बोंबला; आता सुक्या मच्छीच्या बाजाराने अडवली जुन्या दुर्गाडी पुलाची वाट

बोंबला; आता सुक्या मच्छीच्या बाजाराने अडवली जुन्या दुर्गाडी पुलाची वाट

 

कल्याण दि.1 जून :
नविन दुर्गाडी पुलाच्या 2 लेन कालपासून वाहतुकीसाठी खुल्या झाल्याने वाहतूक कोंडीतून मिळालेला दिलासा अल्पायुषीच ठरल्याचे आज सकाळी दिसून आले. पलिकडील कोन गावात मुख्य रस्त्यालगत भरलेल्या सुक्या मच्छीच्या बाजारामूळे कल्याणहून भिवंडी- ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या जुन्या दुर्गाडी पुलावर रांगा लागल्याचे चित्र होते. (old Durgadi bridge blocked by the dried fish market)

बहुप्रतिक्षित अशा नविन दुर्गाडी पुलाच्या 2 लेनचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन आणि नगरविकास तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. नविन पुलाच्या या 2 लेनमुळे इथल्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे. मात्र आज सकाळी भलत्याच कारणामुळे जुन्या दुर्गाडी पुलावर वाहांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आढळून आले. कोन गावात मुख्य रस्त्यालगत पूर्वीपासून सुक्या मासळीचा बाजार भरत आहे. याठिकाणी कल्याणसह आसपासच्या गावांतून मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येत असतात. परिणामी आज सकाळी या कारणामुळे कल्याणहून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावर आज वाहनांचा वेग चांगलाच मंदावल्याचे दिसून आले.

यासंदर्भात कोन गाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली अमोल कराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न पाहता इथल्या सुक्या मासळीच्या बाजाराला केव्हाच मोकळ्या पटांगणावर जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा