Home ठळक बातम्या पत्रीपुल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी सहा तासांचा विशेष ब्लॉक

पत्रीपुल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी सहा तासांचा विशेष ब्लॉक

कल्याण दि.15 नोव्हेंबर :
गेल्या 3 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कल्याणातील जुना पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. हा पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे अनेक लोकल्स,मेल आणि एक्सप्रेसचे वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरलेला पत्रीपुल गेल्या 3 महिन्यांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत होता. हा पूल पाडून याठिकाणी नविन पूल उभारण्यात येणार आहे. परंतु 3 महिने उलटूनही या पुलाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर या पुलाच्या कामाला गती आलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी मध्य रेल्वेने सहा तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 पर्यंत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार असून त्या कालावधीत या पुलाचा लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढण्याचे प्रस्तावित आहे.

परंतु या सहा तासांच्या विशेष ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणार असून अनेक लोकल्स, मेल आणि एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत सीऐसएमटी ते डोंबिवली आणि कर्जत कसारा ते कल्याण या मार्गावर लोकलसेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे यापुढील प्रवासासाठी लोकांना पर्यायी रस्तेवाहतुकीचा अवलंब करावा लागणार आहे.

दरम्यान एकीकडे मुंब्रा बायपासची दुरुस्ती अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाली असताना कल्याणातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा पत्रीपुल केवळ पाडायला 3-3 महिन्यांचा कालावधी लागतोय, याचाही शासकीय यंत्रणांनी आणि लोकप्रतिनिधिंनी विचार केला पाहीजे. असे असले तरी या पुलाच्या कामाला सुरुवात होतेय हेही नसे थोडके.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*