Home ठळक बातम्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीकरांनी अनुभवली स्वरमय संध्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीकरांनी अनुभवली स्वरमय संध्या

ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांच्या सुरेल मैफलीने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

 डोंबिवली दि.२२ मार्च : 

नववर्ष स्वागत यात्रेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने  मंगळवारी स्वरमय संध्या‘ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिध्द  पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी उपस्थितांसमोर सुरेल अशी अनेक अजरामर गाणी सादर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवलीतील फडके रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या संगीत कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराच्या प्रांगणात नुकताच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने  शिव मंदिर आर्ट फेस्टिवल २०२३ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला लाखोच्या संख्येने कलारसिकांनी भेट दिली. याच पद्धतीने डोंबिवलीतील नागरिकांना एक सुरेल अशा संगीत मैफलीचा अनुभव घेता यावा यासाठी  डोंबिवलीवलीतील फडके रोड येथे स्वरमय संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी अनेक अजरामर गाण्यांचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या स्वरमय संगीत संध्येची सुरुवात सुरेश वाडकर यांनी  ओमकार स्वरूपा‘ या गाण्याने केली. यानंतर देवाचिये दारी उभा क्षणभरी‘ हा  अभंग त्यांनी सादर केला. या भक्ती गीतांनंतर मैं हुं प्रेम रोगी‘, ‘और इस दिल में क्या रखा हैं‘, ‘तुमसे मिलके‘, ‘लगी आज सावन की फिर वो झडी है‘, ‘मेघा रे मेघा रे‘, ‘बहौत खुबसुरत हो‘ यांसारखी हिंदी चित्रपट  सृष्टीतील अजरामर गाणी गात मैफलीची रंगत वाढविली. या नंतर पाहिले न मी तुला‘, ‘माजे राणी माजे मोगा‘ यांसारखी मराठी गाणी सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. तर रसिक प्रेक्षकांच्या फर्माइश नुसार राम तेरी गंगा मैली हो गयी‘, “ए जिंदगी गले लगा ले‘, ‘ओ हंसिनी‘ यांसारखी सदाबहार गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळताना लग जा गले‘, ‘तुम से मिलके‘, ‘देर ना हो जाय कही देर ना हो जाये‘ यांसारख्या गाण्यांचे सादरीकरण केले.

संगीत संध्येच्या अखेरीस त्यांचे लोकप्रिय गाणे ‘ सपनो मे मिलती हैं ‘ हे सादर केले. सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांकडून या सादरीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या सुरेल अशा मैफलीत सुरेश वाडकर यांना गायिका आणि त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांची तसेच वाद्यवृदांची साथ लाभली. या संगीत कार्यक्रमामुळे डोंबिवलीकरांची नववर्षाची पूर्वसंध्या अविस्मरणीय ठरली.

पद्मश्री गजानन माने यांचा सत्कार…
या संगीत संध्येला पद्मश्री गजानन माने यांची मुख्य उपस्थितीत लाभली होती. गेली तीन दशकं गजानन माने यांनी कुष्ठरोगिंसाठी केलेल्या अविरत समाजकार्यासाठी त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या संगीत संध्येचे औचित्य साधत यावेळी त्यांचा समस्त नागरिकांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सत्कार केला. तर गजानन माने यांना मिळालेला पद्मश्री हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी बहुमान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी सुरेश वाडकर आणि त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांचाही या प्रसंगी सत्कार केला.

या प्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,  डोंबिवलीचे शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, महेश पाटील, विश्वनाथ राणे, राजेश कदम, नितीन पाटील, रवी पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक मंदार हळबे, गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा