आयएमएच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण दि. 2 जुलै :
डॉक्टरांबद्दल समाजात काहीसे नकारात्मक वातावरण असले तरी कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनची डॉक्टर्स मंडळी मात्र त्याला अपवाद ठरली आहेत. आजच्या डॉक्टर्स डे निमित्त आयएमए कल्याणतर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांसह आयएमएचे डॉक्टर्सही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले.
कठीण काळात कल्याण आयएमएने नेहमीच बजावलीय महत्त्वाची भूमिका…
इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणने सुरुवातीपासूनच आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मग तो कल्याणात आलेला महापुर असो की कोवीडसारखा भयानक काळ. या प्रत्येक कठीण काळात कल्याण आयएमएने आपली महत्त्वाची भूमिका निस्वार्थीपणे बजावली आहे. आपल्याकडे रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. आणि याच भावनेतून यंदाही कल्याण आयएमएतर्फे रेडवेव्ह २०२३ नामक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे यांनी दिली.
नियमित रक्तदात्यांसह प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टरही सहभागी…
कल्याण पश्चिमेच्या गुरुदेव ग्रँड हॉटेलच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदाते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कल्याणातील सकाळ कट्टा ग्रुपमधील केडीएमसी सचिव संजय जाधव, विक्रीकर सहाय्यक आयुक्त प्रमोद बच्छाव आदींनी रक्तदान केले. तर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आतापर्यंत १५० हून अधिक वेळा रक्तदान करणारे डॉ. प्रदीप बालिगा आणि ७३ व्यांदा रक्तदान करणारे डॉ. राजेंद्र लावणकर यांच्यासह डॉ. प्रशांत पाटील, डॉ. आश्विन कक्कर आदी डॉक्टरांनीही यावेळी रक्तदान केले. कल्याणसह आसपासच्या परिसरातील रक्तदत्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी त्यांचे आभार मानले
दरम्यान यावेळी उज्वल शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचाही बिर्ला कॉलेजचे संचालक नरेश चंद्र यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर सचिव डॉ. विकास सूरंजे, खजिनदार डॉ. हिमांशू ठक्कर, सहसचिव डॉ. अमित बोटकुंडले यांच्यासह डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ. ऋतिका भोसले, डॉ. स्वाती शेलार यांनी विशेष मेहनत घेतली.