Site icon LNN

‘एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि. 4 ऑक्टोबर :
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवण्याचा मागणीसाठी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्वेमध्ये घेण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला नागरिक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. कल्याण पूर्वेच्या पुना लिंक रोडवरील सेंट जुडस शाळेसमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. (‘One signature for student safety’: Citizens’ spontaneous response to Harsh Foundation’s signature campaign)

कल्याण पूर्वेतील हजारो शाळकरी मुलं आज जीव मुठीत धरून शाळेपर्यंतचा प्रवास करत आहेत. पुना लिंक रोडवर आतापर्यंत झालेले अनेक लहान मोठे अपघात पाहता या शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर हर्ष फाउंडेशनतर्फे वाहतूक पोलीस, केडीएमसी प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही या गंभीर विषयासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या महत्त्वाच्या मार्गावर
रस्ता दुभाजक (Divider) बसविणे, झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल यंत्रणा बसविणे, शाळा सुटताना-भरताना ट्रॅफिक हवालदार ठेवणे, अवजड वाहनांची वाहतूक फक्त रात्री ८ ते पहाटे ६ या वेळेतच सुरू ठेवणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना “पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा” असे मोठे फलक लावणे अत्यावश्यक बनले आहे. त्यासाठी आम्ही आज हे स्वाक्षरी अभियान घेतले असून त्याला नागरिक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

पुना लिंक महामार्गावर यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी भूमिका या अभियानातून मांडण्यात आली. सकाळी १० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानामध्ये पाच तासांत शेकडो नागरिक आणि पालकांनी स्वाक्षरी करून या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच परिसरातील विविध शाळांनीही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हर्ष फाउंडेशनचे संस्थापक हर्षल शिंदे, अध्यक्षा उर्मिला चौधरी, सचिव अश्विनी बंदीचौडे, सभासद कीर्ती नारखेडे, प्रमिला बढे, पल्लवी शिंदे आणि आदित्य व्यापारी आदींनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version