Site icon LNN

कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुमारे ९०० हून अधिक बसगाड्या रवाना; तब्बल ४५ हजार गणेशभक्तांचा गावी मोफत प्रवास

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोफत बससेवेची व्यवस्था

कल्याण |११ सप्टेंबर :
गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि चिंतामुक्त व्हावा, यासाठी शिवसेनेकडून यंदाही मोठ्या प्रमाणावर मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदा सुमारे ९०० मोफत बसगाड्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या बससेवेच्या माध्यमातून सुमारे ४५ हजार गणेशभक्तांना आपल्या गावी मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे. (Over 900 Buses Depart from Kalyan Lok Sabha Constituency, Providing Free Travel to 45,000 Ganesh Devotees to Their Hometowns)

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भावनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. विशेषतः कोकणातील गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असून, मुंबई, ठाणे आणि परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जात असतात. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने चाकरमान्यांना प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन कल्याण लोकसभा शिवसेनेकडून गेल्या काही वर्षांपासून गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

यंदा या उपक्रमाचा विस्तार करत कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध भागांतून सुमारे ९०० बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण शहरातून सुमारे २५०, डोंबिवली शहरातून ३५५, दिवा येथून १४७ आणि कळवा येथून १४७ बसगाड्या रवाना झाल्या आहेत. तसेच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथूनही उर्वरित बसगाड्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

या बसगाड्यांमधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, चिपळूण, लांजा, देवगड यांसह कोकणातील विविध भागांबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध गावांकडे गणेशभक्त रवाना झाले आहेत.

सुमारे ४५ हजार गणेशभक्तांना या मोफत बससेवेचा थेट लाभ मिळाला असून, आपल्या कुटुंबीयांसह गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचा गावी जाण्याचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपल्या मातीशी, आपल्या गावाशी जोडले जाण्याची भावना लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आपल्या मतदारसंघातील एकही गणेशभक्त केवळ प्रवासाच्या अडचणीमुळे आपल्या गावी जाण्यापासून वंचित राहू नये, या भावनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी या मोफत बससेवेचे आयोजन केले जाते. ‘गणेशोत्सव आपल्या मातीशी जोडणारा उत्सव आहे आणि गणेशभक्तांचा गावी जाण्याचा प्रवास हा आनंदाचा असला पाहिजे’, या भावनेतून यंदा तब्बल ९०० हुन अधिक बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमाबद्दल गणेशभक्त आणि चाकरमान्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या हजारो कुटुंबांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version