मृत्यू झालेल्या 11 पैकी 9 जणांची ओळख पटली
कल्याण दि.13 एप्रिल :
कल्याण – मुरबाड -अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताची माहिती आता समोर आली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये हा अपघात झाल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत असून त्यामध्ये खासगी प्रवासी गाडीतील तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Overtaking Turns Fatal; 11 Killed in Tragic Accident on Rayate Bridge)
आज सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास रायते पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. नियमापेक्षा अधिक प्रवाशांनी खचाखच भरलेल्या आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या या खासगी इको गाडीने ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की इको गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. काही प्रवाशांचा तर जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
या अपघातात 11 पैकी 9 जणांची ओळख पटवण्यात आली असून उर्वरित 2 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहितीही आमदार किसन कथोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान या भीषण अपघातानंतर कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील खासगी काळी पिवळी गाड्यांतील प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे आणि भरधाव वेगाने या गाड्या चालवण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे…
1. प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने,पुरुष,वय 21 वर्ष, देवगाव मुरबाड
2. भूषण घोरपडे, पुरुष,वय 49 वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक.
3. जिजा गोविंदा केंबारी, महिला,वय 50 वर्ष, टेंभरे मुरबाड
4. अनंता पवार, पुरुष,साखरे मुरबाड
5. दीपक गवळी, पुरुष,राहणार कल्याण
6. गणपत जैनू मधे,पुरुष, वय 32 वर्ष, देवराळवाडी मुरबाड
7. स्नेहा मोहपे, महिला,वय अंदाजे 22 वर्ष, नारायणगाव मुरबाड
8. मानसी मोहपे,महिला, वय अंदाजे 20 वर्ष, नारायणगाव मुरबाड
9. प्रथमेश मोहपे, पुरुष,वय अंदाजे 17 वर्ष, नारायणगाव मुरबाड.
• अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे.

