Home ठळक बातम्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित पहिलं स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पत्रकार दिनानिमित्त आयोजित पहिलं स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कल्याण दि.7 जानेवारी :
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा पत्रकार दिन रविवारी कल्याणात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस व पत्रकार यांच्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

ऑन ड्युटी चोवीस तास असल्याने पत्रकार आणि पोलीस यांना स्वतःसाठी निवांत असा वेळ मिळत नाही. त्यात कामाच्या दबावामुळे पत्रकार आणि पोलीस मोठ्या प्रमाणात मानसिक तणावात जात असल्याचे आढळून येते. हे लक्षात घेऊन कल्याण, डोंबिवली, टिटवाळा येथील पत्रकारांनी मिळून पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत महाराष्ट्रातील पहिलं स्नेहसंमेलन आयोजित केले.

कल्याणमधील अत्रे रंगमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रा. दिनेश गुप्ता यांनी व्यक्तिमत्व शिबिराच्या माध्यमातून पोलीस आणि पत्रकारांना मानसिक तणावातून बाहेर कसं यायचं याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यानंतर दुसऱ्या सत्रात टीव्ही ९ चॅनल चे राजकीय संपादक विलास आठवले, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, दत्तात्रय कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर या मान्यवर मंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण होते पत्रकार आणि पोलीस यांनी सादर केलेल्या विविध कलाकृती. यामध्ये पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांनी गाणे गाऊन, नृत्य करून मिमिक्री करून आपल्यातील सुप्त कलागुण सर्वांसमोर दाखविले आणि उपस्थितांची दाद मिळविली. या कार्यक्रमात परिमंडळ ३ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पत्रकार आणि पोलिसांचं कुटुंब आवर्जून उपस्थित होते.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*