Home ठळक बातम्या केडीएमटीच्या ‘तेजस्विनी बसेसचा मार्ग मोकळा; करारावर झाल्या स्वाक्षऱ्या

केडीएमटीच्या ‘तेजस्विनी बसेसचा मार्ग मोकळा; करारावर झाल्या स्वाक्षऱ्या

 

कल्याण/डोंबिवली दि.17 फेब्रुवारी :
केडीएमटीतर्फे महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या तेजस्विनी या विशेष बससेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. तेजस्विनी बसेस खरेदी करारावर परिवहन समिती सभापती मनोज चौधरी आणि परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्या नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

गेल्या 4 वर्षांपासून तेजस्विनी बससेवा केडीएमटीमध्ये येण्याविषयी चर्चा आणि प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने 1 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर होऊनही हा उपक्रम प्रतीक्षेत होता. परंतू याला अखेर मूर्तस्वरूप येण्यास सुरुवात झाली सध्या 4 बस केडीएमटीच्या सेवेत घेण्यात येणार आहेत. या 4 बसेस कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या परिसरातील मार्गांवर चालवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली. कार्यालयीन आणि गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी या तेजस्विनी बस घेण्यात येणार आहेत. या बस सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 5 ते रात्री 9 या वेळेत चालविण्यात येतील. इतर वेळेत सर्व प्रवाशांना त्यातून प्रवास करण्याची मुभा असेल असे परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी सांगितले.

तर येत्या 8 मार्च रोजी असणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून ही बससेवा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी आणि परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा