Home ठळक बातम्या उल्हास नदीतील जलपर्णी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची...

उल्हास नदीतील जलपर्णी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कल्याण दि.27 फेब्रुवारी :
ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत (ulhas river pollution) दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दिली. उल्हास नदीतील प्रदूषणाच्या समस्येविरोधात ‘मी कल्याणकर सामाजिक संस्थे’चे नितीन निकम आणि त्यांचे सहकारी उल्हास नदीपात्रात आंदोलनाला बसले होते. एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची भेट घेत ही ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.

भडसावळे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने औरंगाबाद येथे ४० एकरवर पसरलेल्या डॉ. सलीम अली तलावातील जलपर्णी दोन वर्षांपूर्वी नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 2 वर्षात तिथे ही समस्या पुन्हा उद्भवलेली नाही. याच तंत्रज्ञानाची मदत उल्हास नदीतील जलपर्णीची समस्या निकाली काढण्यासाठी घेण्यात येणार आहे. तसेच, तातडीची बाब म्हणून सोमवार पासून मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्याचे आदेशही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

उल्हास नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका यांच्या माध्यमातून एसटीपी उभारले जात आहेत. खेमाणी येथील एसटीपीचे काम पूर्ण झाले असून कल्याण-डोंबिवली हद्दीतील ५ एसटीपीचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच तातडीची बाब म्हणून या नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आदी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा