Home ठळक बातम्या नयनरम्य रोषणाईने उजळून निघाला डोंबिवलीचा फडके रोड

नयनरम्य रोषणाईने उजळून निघाला डोंबिवलीचा फडके रोड

मनसे आमदार राजू पाटील यांची संकल्पना

डोंबिवली दि.२३ ऑक्टोबर :
डोंबिवलीला सांस्कृतिक नगरी अशी ओळख देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि अनेकविध सांस्कृतिक उपक्रमांचे जन्मस्थान असणाऱ्या फडके रोडला सध्या वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. दिवाळीचे औचित्य साधून मनसे आमदार राजू पाटील यांच्या संकल्पनेतून फडके रोडवर करण्यात आलेली नयनरम्य रोषणाई सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

डोंबिवली नगरी, डोंबिवलीकर आणि फडके रोड यांचं नातं म्हणजे जणू काही श्वास आणि हृदयाचं. एकमेकांशिवाय दोघांच्याही आयुष्याला पूर्णत्व नाहीच. आणि त्यातही दिवाळी म्हटली की फडके रोडशिवाय त्या दिवाळीला काहीच अर्थ नाही. नेमका हाच धागा पकडून मनसे आमदार राजू पाटील यांनी राबवलेल्या ‘उत्सव दिव्यांचा ‘ या तेजोमय उपक्रमामूळे तर फडके रोडला आणखीनच चकाकी आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणपती मंदिर, आप्पा दातार चौक आणि फडके रोडवर करण्यात आलेली सुंदर अशी विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फिटेल अशी आहे.

दोन वर्षांच्या कोवीडच्या कटु आठवणींवर फुंकर घालण्यासह केवळ नव्याच नव्हे तर अत्यंत सुंदर अशा आठवणी पुन्हा एकदा बनवण्यात त्याची नक्कीच मदत होईल. फडके रोडला एक विशेष महत्व असून इथे तरुणाईचा उत्साह सळळत असतो. त्या अनुषंगाने येथे येणाऱ्या तरुण तरुणाईला दिवाळाचा आणखी चांगला आनंद घेता यावा ही रोषणाई केली आहे. काही काळाकरीता तरी महागाईचे दुखणे, खराब रस्ते, इथकी अव्यवस्था यातून कुठेतरी लोकांना दिलासा मिळावा, त्यासाठी हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा