Site icon LNN

प्रत्येकाने एक झाड लावल्यास कल्याण-डोंबिवली स्वच्छ, सुंदर आणि हरित बनेल – आयुक्त अभिनव गोयल

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिर्ला कॉलेजशेजारील नव्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम वृक्षारोपण

कल्याण, ५ जून :
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनू शकते, असा विश्वास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला शाळेजवळ नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम प्रजातीच्या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Plant One Tree, Make Kalyan-Dombivli Clean, Green and Beautiful: KDMC Commissioner Abhinav Goyal)

यावेळी बोलताना आयुक्त गोयल यांनी सांगितले की, यंदा केडीएमसीने शहरात दीड लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प, मोकळ्या जागा, उद्याने, स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या मोहिमेत विविध प्रजातींची झाडे, तसेच मियावाकी, स्कॅटर्ड प्लांटेशन यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन किमान एक झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बिर्ला महाविद्यालय शेजारील नव्या रस्त्यावर केडीएमसी आणि विकासकांच्या सहकार्याने चेरी ब्लॉसम प्रजातीची तब्बल ४०० झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षांमुळे येत्या काही महिन्यांत हा संपूर्ण परिसर अधिक आकर्षक, निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

विशेष म्हणजे या वृक्षारोपण मोहिमेत बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण आणि हरित शहर उभारणीच्या दिशेने केडीएमसीने सुरू केलेली ही व्यापक वृक्षारोपण मोहीम शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Exit mobile version