Site icon LNN

कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट; भुरटे चोरे, मद्यपी, समाजकंटकांसह ३५० जणांवर कारवाई

अशी मोहीम यापुढेही सुरू ठेवणार डी सी पी अतुल झेंडे

कल्याण डोंबिवली दि.26 ऑक्टोबर :
कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, तसेच रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणांवर मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन, तसेच छुप्या गैरधंद्यांचे अड्डे वाढीस लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. (Police conducts all-out operation in Kalyan-Dombivli; Action taken against 350 people including thieves, drunkards, and anti-social elements)

या मोहिमेत एकूण २४० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. रात्री आठ ते पहाटे चार या वेळेत कल्याण आणि डोंबिवली शहरातील विविध भागांत एकाच वेळी धरपकड मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३५० हून अधिक समाजकंटक, गुंड, मद्यपी आणि गैरधंदे करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

शहर नशामुक्त करण्याचा प्रयत्न…
गेल्या वर्षीही अशाच प्रकारची मोहीम सलग दोन ते तीन महिने राबवून पोलीस दलाने शहरातील अनेक गैरधंदे, अड्डे उद्ध्वस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ही मोहीम ‘कल्याण-डोंबिवली नशामुक्त शहर’ या उद्दिष्टाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अलीकडे पुन्हा काही अड्डे आणि अवैध व्यवहार सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आठही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक आदेश देऊन शनिवारी रात्री धडक छापा टाकण्याचे निर्देश दिले. या कारवाईत उपायुक्त झेंडे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः सहभागी झाले.


रेल्वे स्थानक परिसरात झडती…
कल्याण रेल्वे स्थानक परिसर, वाहनतळ, आणि झाडाझुडपांमध्ये लपून मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले. काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्यांना पकडले. अनेक ठिकाणी पकडलेल्या व्यक्तींना परिसरातून पोलिसांनी वरात काढत पोलिस ठाण्यात आणले.

या कारवाईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सहा खतरनाक गुंडांना अटक करण्यात आली, तर २७ तडीपार गुंडांची चौकशी करण्यात आली.

सुस्थित घरातीलही काही जण सहभागी…
या मोहिमेत पकडलेल्या मद्यपींमध्ये काही सुस्थितीत घरातील तरुणांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयीन कारवाई सुरू आहे. रात्री आठपासून पहाटे चारपर्यंत सुरू असलेली ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की कल्याण- डोंबिवली शहर परिसरात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे, शांततेचा भंग करणारे आणि गैरधंद्यांत गुंतलेले सर्व जण ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असून अशी मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाईल.

Exit mobile version