कल्याण, दि. ९ नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कल्याण पूर्वेतील एक वजनदार राजकीय नेतृत्व अशी ओळख असलेल्या महेश गायकवाड यांची शिवसेनेच्या कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महेश गायकवाड यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले. (Political developments gain momentum in Kalyan-Dombivli; Mahesh Gaikwad appointed as Shiv Sena (Shinde faction) Assembly sampark pramukh for Kalyan East–Ulhasnagar constituency)
महापालिका निवडणुकीच्या एकीकडे भाजपमध्ये कल्याण डोंबिवलीतून जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. त्यातच काही आठवड्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महेश गायकवाड यांची भेट घेतली होती. त्यानंतर गायकवाड हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महेश गायकवाड यांची कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम मिळाला आहे. विधानसभा निवडणूक काळामध्ये पक्षाकडून निलंबनाची कारवाई होऊनही महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची साथ सोडली नव्हती. ती पाहता आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आलेल्या या कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, शहरप्रमुख निलेश शिंदे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

