Site icon LNN

युद्धजन्य परिस्थितीत राजकारण करणं अत्यंत दुर्देवी – उपमुख्यमंत्री शिंदे यांची विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर टिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत घेतली भेट

नवी दिल्ली दि. 17 मार्च :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये इराण-इस्त्राईल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा असून आम्ही देशासोबत आहोत असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना दिले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (“Politicising in a War-like Situation is Extremely Unfortunate,” Says Deputy CM Shinde, Criticises Opposition Leader Rahul Gandhi)

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करुन राजकारण करणं हे अत्यंत दुर्देवी आणि देशविरोधी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. पाकिस्तानमध्ये हेडलाईन्स होण्यासाठी काहीजण बोलतात, असा टोला त्यांनी गांधी यांना लगावला. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांसाठी देश प्रथम आणि नंतर राजकारण असायचे. आज बाळासाहेबांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. युद्धामुळे कुवेत, दुबई, मस्कत या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा मुंबई पुणे येथे सुखरुप आणल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. कोविडपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांसोबत निर्माण झालेल्या चांगल्या संबंधांमुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताची तेल वाहून नेणारी दोन जहाजे सुखरुप मायदेशी आली, त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे या बैठकीत आभार मानले. राज्यातील विकास कामे आणि विविध प्रश्नांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माहिती दिली.


युद्धजन्य परिस्थितीचा विरोधक राजकारणासाठी वापर करत आहेत, हे दुर्देवी आहे. देशात गॅस टंचाई असल्याच्या अफवा काँग्रेस आणि उबाठा पसरवत आहेत. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना संधी मिळतेय. राजकारणासाठी इतर विषय आहेत मात्र युद्धजन्य परिस्थितीत देशासोबत राहणे अपेक्षित असताना विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी देखील विरोधकांनी असेच राजकारण केले होते. ज्याची पाकिस्तानात दखल घेतली गेली. काहीजण पाकिस्तानात हेडलाईन्स होण्यासाठी बोलतात, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांच्यावर केली. देशात गॅस टंचाईचा विषय आणि विरोधकांकडून होणारा खोटा प्रचार सभागृहात हाणून पाडण्याबाबत शिवसेना खासदारांना सडेतोड भूमिका घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. राज्यात कुठेही गॅस सिलिंडरची टंचाई नाही. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्तकपणे काम करतेय, असे ते म्हणाले. राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या उच्चविद्याभूषित असून गरिबांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधानांसोबतच्या भेटीत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर हे खासदार उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही संसदेतील अध्यक्षांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, पियूष गोयल उपस्थित होते. तत्पूर्वी संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी संसद भवनात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री रिजीजू यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेतील कामगिरीचे कौतुक केले. श्रीकांत लहान भाऊ असून सभागृहात चांगलं काम करतोय, असे रिजीजू म्हणाले.

Exit mobile version