Home ठळक बातम्या क्या बात है : ‘रोटी डे’ च्या माध्यमातून भरले जातेय गरीबांचे पोट

क्या बात है : ‘रोटी डे’ च्या माध्यमातून भरले जातेय गरीबांचे पोट

गेल्या ५ वर्षांपासून दर रविवारी राबवला जातोय स्तुत्य उपक्रम

कल्याण दि.३ जानेवारी :
आपल्या संस्कृतीत दानाला खूप महत्व आहे. त्यातही ते अन्नदान असेल तर ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ दान समजले जाते. ‘भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी’ या शिकवणीचा धागा पकडून कल्याणातील संवेदनशील नागरिक ‘ रोटी डे ‘ च्या माध्यमातून गरिबांचे पोट भरत आहेत.

वीटभट्टी, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या गरिबांचे आणि त्यातही लहान मुलांचे पोट भरण्याच्या उद्देशाने कल्याणातील काही जण एकत्र आले आणि त्यांनी या अनोख्या अशा ‘रोटी डे’ उपक्रमाची ५ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली.

दर रविवारी साजरा होतो ‘रोटी डे ‘ उपक्रम…
आपल्या समाजात उपाशीपोटी असलेल्या मुलांना किमान एक दिवस तरी पोटभर जेवण मिळावे, मुख्य प्रवाहातील मुलांप्रमाणेच या मुलांनाही वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने या सर्वांनी मग आठवड्यातील प्रत्येक रविवारी ‘रोटी डे ‘ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. गेल्या ५ वर्षांपासून एकही खंड न पडता रोटी डे च्या माध्यमातून गरिबांच्या वस्तीतील चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला जात असल्याची माहिती या ग्रुपतर्फे एलएनएनला देण्यात आली.

कल्याणच्या आसपासच्या गरीब वस्तीत राबवतात उपक्रम…
कल्याण शहराच्या आसपास असलेल्या कोन गाव, वाडेघर, बापगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात गरिबांची वस्ती आहे. आम्ही दर रविवारी या वेगवेगळ्या भागात हा उपक्रम राबवत असतो. त्यासोबत थंडीमध्ये ब्लँकेट, पावसाळ्यात छत्री – रेनकोट यांच्यासह शालेय साहित्यांचे वाटपही रोटी डे च्या माध्यमातून करत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

कोवीडनंतर उपक्रमाला बसली आर्थिक झळ…
सुरुवातीला आम्ही सर्व जण वर्गणी काढून हा उपक्रम राबवायचो. एका रविवारच्या उपक्रमासाठी साधारणपणे दहा हजार रुपये खर्च येत असून हळूहळू त्याला काही जणांची आर्थिक मदत मिळत गेली. मात्र कोवीडनंतर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमूळे काहीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. आणि आज अशी परिस्थिती आहे की या महिन्यातील सर्व रविवारला दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे.

कल्याण डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतचे सदस्य सहभागी…
या उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा बहुतांश सदस्य हे कल्याण परिसरातील होते. मात्र गेल्या पाच वर्षांच्या या कार्यकाळात यामध्ये वेगवेगळ्या शहराच्या विविध क्षेत्रातील अनेक सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील मिळून रोटी डे उपक्रमाची सदस्य संख्या आजच्या घडीला अडीचशेच्या घरात पोहचले आहेत.

आपल्या समाजात उपाशीपोटी असणाऱ्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर नव्हे तर त्यांच्या दुःखांवरही आपुलकीची फुंकर मारण्याचा या अनोख्या आणि तितक्याच स्तुत्य अशा उपक्रमाला एलएनएनकडून त्रिवार सलाम.

या उपक्रमाला मदत करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क : 9821136418

 

केतन बेटावदकर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा