अंत पाहू नका, आज रात्रीपर्यंत रस्ते चांगले करा
डोंबिवली दि.5 सप्टेंबर :
रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याबाबत केडीएमसी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरुन कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्हीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे नागरिकांचा वाढता रोष आणि दुसरीकडे राजकीय पक्षांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा असे दुहेरी चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहर मनसेने केडीएमसी शहर अभियंत्यांना खड्ड्यांच्या विषयावरून चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. तसेच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आज रात्रीपूर्वी खड्डे भरले नाहीत तर अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये उभे करू असा संतप्त इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Potholes on roads: Dombivli city MNS warns KDMC city engineers )
केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी या कार्यकारी अभियंता मनोज सांगळे आणि उपअभियंता विनयकुमार सातपुते यांच्यासह डोंबिवलीच्या चोळेगाव विसर्जन तलावाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी शहर अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. पाऊस थांबलेला तेव्हा खड्डे का भरले नाहीत? आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आज रात्री काहीही करून सर्व खड्डे भरा अन्यथा त्याच खड्ड्यांमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांना उभे करू अशा शब्दांत मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी शहर अभियंत्यांना खडे बोल सुनावले.
यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. प्रल्हाद म्हात्रे, विधानसभा सचिव श्री. उदय वेळासकर, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे, उपशहरअध्यक्ष प्रेम पाटील, विभागअध्यक्ष प्रदीप चौधरी, कदम भोईर, शाखाध्यक्ष विजय यादव, संजय सरमळकर, राजस लिंगायत प्रितेश पाटील (जिल्हा सचिव, मनविसे), सागर मुळे (शहर संघटक, रस्ते आस्थापना व साधन सुविधा), तेजस शिंदे (उपशहर संघटक) आदि पदधिकारी आणि महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.
Pathholes filling work doing at the time of rain and water surface.