Site icon LNN

कल्याण पश्चिमेच्या व्यापारी भागातील वीज पुरवठा 23 तासांनंतर पूर्ववत, संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात बंद

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यानंतर झाले काम

कल्याण दि.5 सप्टेंबर :
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी भाग गुरुवार सायंकाळपासून तब्बल 23 तास अंधारात बुडाला होता. वीज वाहिनीतील अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला आणि शुक्रवार दुपारचे तीन वाजले तरीही वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी अचानक दुकाने बंद ठेऊन आपला रोष व्यक्त केला. मात्र माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, केडीएसमी आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करून 23 तासांनंतर हा वीज पुरवठा सुरू झाला. (Power supply restored in commercial areas of Kalyan West after 23 hours, angry traders strike against Mahavitaran)

ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील व्यापारी वर्गाने एकत्र येत आपली दुकाने बंद ठेवून महावितरणच्या कारभाराविरोधात निषेध नोंदवला. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची वीजबिले भरूनही महावितरणकडून योग्य सेवा मिळत नाही. प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे आम्हाला तोटा सोसावा लागतो.” सणासुदीच्या काळात दुकानदारांना विक्रीतून मोठी कमाई अपेक्षित असते. मात्र सलग २२ तास वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यवहार ठप्प झाले. काही व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंनाही फटका बसला. व्यापाऱ्यांनी महावितरणवर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला. तर महावितरणकडून नवीन केबल उपलब्ध नसल्याचे कारण, अधिकारी वर्गाकडून प्रत्यक्ष जागेवर न येता उडवाउडवीची उत्तरे देणे यासोबतच “काम कधी होईल हे सांगू शकत नाही, तुमच्या समस्या आम्हाला सांगू नका, वरिष्ठ माझे काही करू शकत नाही”अशा शब्दात एक अधिकारी आमच्याशी बोलत असल्याच्या तक्रारीही या व्यापाऱ्यांनी केल्या आहेत.

नरेंद्र पवारांची तातडीची धाव आणि प्रश्न सुटला…
दरम्यान, कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज वाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही तर नरेंद्र पवार यांनी यावेळी महावितरणच्या तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सांगितले की,”व्यापारी वर्ग वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे वीजबिले भरत आहे. मात्र महावितरणकडून त्यांना अशाप्रकारे दिली जाणारी वागणूक अत्यंत चुकीची आहे. दरवर्षी करोडो रुपयांची बिले नियमित भरूनही व्यापाऱ्यांना मूलभूत सेवा देण्यात महावितरण अपयशी ठरत असून हे अत्यंत गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यावर नविन वीज वाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यासाठी आम्ही केडीएमसी प्रशासनाकडे पाच महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप ही परवानगी मिळाली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितले.

त्यावर पवार यांनी केडीएमसी शहर अभियंता आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियत्यांशी संपर्क साधून महावितरणला तातडीने ही परवानगी देण्यास सांगितले. तसेच पवार यांनी वाहतूक पोलिसांशीही संपर्क साधून ही गंभीर समस्या समजावून सांगत हे काम होऊ देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

व्यापारी वर्गाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि माजी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने तत्काळ मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठवले. दुपारनंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आणि तब्बल 23 तासांनंतर खंडीत झालेला हा वीज पुरवठा सुरळीत झाला.

ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाने पुकारलेले हे बंद आंदोलन मागे घेण्याची विनंतीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यापारी वर्गाला केली. त्यानुसार काम सुरू झाल्याचे दिसून येताच व्यापारी वर्गानेंही पवार यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपला बंद मागे घेतला आणि आपापली दुकाने पुन्हा उघडली.

 

महावितरणला पत्र व्यवहार करूनही आमच्या केबल बदलण्याच्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली. अधिकारी उत्तर देत नाहीत.व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांनी बंद पाळला. यापुढे असे झाल्यास व्यापारी कायदा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही.-
हरिष खंडेलवाल अध्यक्ष कल्याण महानगर व्यापारी फेडरेशन नियोजित

Exit mobile version