Home ठळक बातम्या डोंबिवलीतील 150 फुटी तिरंग्याची तयारी अंतिम टप्प्यात; नयनरम्य रोषणाईने उजळला परिसर

डोंबिवलीतील 150 फुटी तिरंग्याची तयारी अंतिम टप्प्यात; नयनरम्य रोषणाईने उजळला परिसर

डोंबिवली दि.24 जानेवारी :
डोंबिवलीकरासाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन दरवर्षीपेक्षा काहीसा खास असणार आहे. त्याला कारणही तसे खासच असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज डोंबिवलीत डौलाने फडकणार आहे. हा 150 फुटी झेंडा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून आतापासूनच डोंबिवलीकरांची याठिकाणी मोठी गर्दी होत आहे.

26 जानेवारीचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 76 आणि 77 मधील दत्तनगर चौकात हा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आणि शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले जाणार आहे.
150 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाचा खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्यावर 30 बाय 20 फुट आकाराचा कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. तर या राष्ट्रध्वजाच्या शेजारीच राष्ट्रपुरुषांची अत्यंत सुंदर अशी शिल्पही साकारण्यात आली आहेत. प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना आणखीन बळकट होण्याच्या उद्देशाने आपण ही राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडल्याचेही राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान राष्ट्रध्वज उभारणीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही प्रभागांमधील रस्त्यांवर आणि इमारतींवर अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्याच्या रंगाच्या या विद्युत रोषणाईने संकल्पतिर्थासह संपूर्ण परिसर झगमगून गेला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा