Site icon LNN

गांधारी पुलाच्या गर्डरवरील संरक्षक लोखंडी पट्टी गायब; अपघात होण्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीची मागणी

कल्याण | ३ ऑगस्ट :
कल्याण-पडघा मार्गावरील अतिशय महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या गांधारी उड्डाणपुलावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुलाच्या गर्डरवरील लोखंडी संरक्षक पट्टी (सेफ्टी बॅरिअर) गायब झाल्याचे समोर आले असून त्यामुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यामुळे निर्माण झालेल्या फटीतून थेट गांधारी नदीचे पात्र दिसत असल्याचेही समोर आले आहे.
(Protective Steel Guard Strip Missing from Gandhari Bridge Girder; Immediate Repairs Urged Before a Major Accident)

यापूर्वीच या पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता संरक्षक पट्टी निखळल्याने किंवा गायब झाल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. अवजड वाहनांसह दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाहनचालकांनी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन पुलावरील लोखंडी संरक्षक पट्टी त्वरित बसवावी, तसेच पुलावरील खड्ड्यांचीही युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

व्हिडिओ/ फोटो माहिती सौजन्य – राहुल कारभारी, गांधारी गाव, एलएनएन सिटीझन रिपोर्टर

Exit mobile version