Site icon LNN

अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये प्रथमच पुण्याच्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची प्रतिकृती विराजमान

ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अमेरिकेत अनोखा गणेशोत्सव; ४००-५०० भाविकांच्या उपस्थितीत गणरायाचे जल्लोषात आगमन

ह्युस्टन (अमेरिका) १६ सप्टेंबर :
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा सुगंध आता सातासमुद्रापारही दरवळत आहे. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची प्रतिकृती प्रथमच अमेरिकेतील ह्युस्टन येथे स्थापन करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये ही प्रतिकृती तब्बल दहा दिवसांसाठी विराजमान राहणार असून, या निमित्ताने ह्युस्टनमधील मराठी बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (Pune’s First ‘Manacha Ganpati’ — Shri Kasba Ganpati Replica Installed in Houston, USA for the First Time)

गणेशोत्सवाची सुरुवात रविवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेशाची माता देवी पार्वतीने केलेल्या हरितालिका व्रताच्या पूजनाने झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे २० महिला – मुलींनी पुरोहित सौ. अचला बापट यांच्या पौरोहित्याखाली विधिवत आणि भक्तिभावाने हरितालिका पूजन केले. यावेळी देवी पार्वतीच्या चरणी प्रार्थना करत, ‘गणेश बाळाला आमच्याकडे पाठव हं!’ असा भावनिक सांगावा देण्यात आला.

यानंतर ‘मोरया ढोल-ताशा पथका’च्या ढोल, ताशा, झांजा आणि ध्वजांचे विधिवत पूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादाने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. पुण्यातून विशेष भक्तिभावाने आणण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीच्या आगमनाची भाविकांना मोठी उत्सुकता होती.

त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आवारातून देखण्या पालखीतून गणरायाची लोभस मूर्ती मिरवणुकीने मंदिराकडे आणण्यात आली. ढोलकी, टाळ, मृदुंग आणि ध्वजांच्या साथीने सादर झालेल्या भजनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ‘मोरया ढोल-ताशा पथका’च्या सूरबद्ध आणि लयबद्ध वादनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

या भव्य आगमन सोहळ्यासाठी तब्बल ४०० ते ५०० भाविक उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तीचा जयघोष आणि मराठमोळ्या उत्साहाच्या वातावरणात श्री गणरायाची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात आली.

सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी भाविकांच्या उपस्थितीत श्री गजाननाची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या प्रतिकृतीची अमेरिकेत प्रथमच झालेली स्थापना हा ह्युस्टनमधील मराठी समाजासाठी निश्चितच सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मुकुटमणी असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता ह्युस्टनमध्येही मराठमोळ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असून, पुढील दहा दिवस विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसह गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

माहिती आणि छायाचित्रे सौजन्य: पौर्णिमा आतकरी/ गोपाळ दंडगव्हाळे

Exit mobile version