कल्याण दि.10 एप्रिल :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाळ्याचा तडाखा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अलीकडील ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या मालिकेनंतर आता राज्यात नेहमीच्या उन्हाळी परिस्थितीची पुनरागमन होत असून पुढील ५ ते ७ दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (Rapid Rise in Temperatures Across Maharashtra; Heatwave Likely Next Week)
येत्या काही दिवसांत राज्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार असून सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होईल. पुढील आठवड्याच्या मध्यावर राज्यात उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता मोडक यांनी वर्तवली आहे.
प्रादेशिक तापमान अंदाज (पुढील ५-७ दिवस)…
अंतर्गत कोकण : ४० ते ४२°C (११-१२ एप्रिल दरम्यान शिखर)
किनारी कोकण / मुंबई : ३५ ते ३७°C
पुणे / नाशिक (डेक्कन भाग) : ३८ ते ४०°C
मराठवाडा ते विदर्भ (संभाजीनगर ते नागपूर) : सुरुवातीला ३९ ते ४१°C, पुढे वाढून ४२ ते ४५°C पर्यंत जाण्याची शक्यता
एप्रिल महिन्यातील सामान्य हवामान…
सामान्यतः एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमान ३७ ते ४०°C दरम्यान असते. मात्र समुद्र किनाऱ्यालगतचा अरुंद पट्ट्यामध्ये (०-५ किमी) जिथे तापमान ३३ ते ३४°C दरम्यान राहणार असल्याचेही हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले आहे.
अंतर्गत कोकण: ३७ ते ४०°C
मराठवाडा व विदर्भ : मे महिन्यात सामान्य तापमान ४० ते ४३°C
नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
अल्पकाळाच्या गारव्याच्या कालावधीनंतर आता उष्णतेची तीव्र लाट परतण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
एकंदरीत राज्यात उन्हाळ्याचा जोरदार पुनरागमन होत असून पुढील आठवड्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

