Home ठळक बातम्या मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत जल्लोषात स्वागत

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत जल्लोषात स्वागत

 

डोंबिवली दि.९ ऑगस्ट :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत आज जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा राज्य सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आज सकाळी करण्यात आला. ज्यामध्ये भाजपतर्फे आमदार रविंद्र चव्हाण यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात चव्हाण यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद अत्यंत सक्षमपणे सांभाळले होते. मात्र गेल्या काही वर्षांत रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील ठाणे, पालघरमध्ये पक्षवाढीसाठी केलेले काम आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेना आमदारांच्या नियोजनातही रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कामाच्या बळावरच आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात रविंद्र चव्हाण यांनाही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण हे आज सायंकाळी डोंबिवलीत परतले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. एकीकडे फटाक्यांची आतीषबाजी, ढोल ताशाचा गजर आणि दुसरीकडे जोरदार घोषणाबाजीमध्ये रविंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच डोंबिवली पूर्वेकडील घारडा सर्कल ते गणपती मंदिरापर्यंत मंत्री रवींद्र चव्हाण यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. पुन्हा एकदा मिळालेल्या या मंत्री पदाबद्दल रविंद्र चव्हाण यांनी यावेळी डोंबिवलीकर मतदारांचे आभार मानले.

मागील लेखभारत जोडो अभियानांतर्गत डोंबिवलीतही काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा
पुढील लेख…आणि महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची झाली चिखलातून सुटका

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा