कल्याण दि.24 नोव्हेंबर:
कल्याण मुरबाड मार्गावरील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा शहाड उड्डाणपूल हा काल रात्री 12 वाजल्यानंतर वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. डांबरीकरणाच्या कामासाठी गेल्या 20 दिवसांपासून तो बंद ठेवण्यात आल्याने कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मात्र आता हा उड्डाणपूल पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा हा त्रास काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. (Relief at Last: Shahad Flyover Reopens for Traffic After 20 Days)
पावसाळ्यात पडलेले भयानक मोठे खड्डे, या खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि या उड्डाणपुलाचे झालेले आयुर्मान पाहता त्यावर डांबरीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या 3 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र हा उड्डाणपूल बंद करताना संबंधित प्रशासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आवश्यक असलेल्या उपाययोजना योग्य पद्धतीने न करण्यात आल्याने वाहन चालकांना अक्षरशः वाहतूक कोंडाच्या नरक यातना भोगाव्या लागल्या.
शहाड उड्डाणपूल बंद झाल्याने वाहतुकीचा सर्व ताण हा वालधुनी पुलावर आला. मात्र या उड्डाणपुलाची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी. शहाड उड्डाणपूल बंद करण्यापूर्वी वालधुनी पुलावरील खड्डे भरण्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या 20 दिवसांत नागरिकांचा मोठा वेळ, हजारो रुपयांचे पेट्रोल डिझेल वाया जाण्यासह झालेला मानसिक त्रास हा तर वेगळाच होता. परंतु नागरिकांच्या त्रासाची दखल घेऊन काम केले तर तिला शासकीय यंत्रणा कसे म्हणणार? नागरिकांना त्रास होतोय ना मग होऊ द्या, आपली गाडी तर त्यामध्ये अडकत नाहीये ना.? मग काळजीचे काही कारण नाही अशा मानसिकतेत ही प्रशासकीय यंत्रणा दिसून आली.
असो. अखेर 20 दिवस चाललेल्या या डांबरीकरणाच्या कामानंतर हा शहाड उड्डाणपूल काल रात्री 12 वाजल्यानंतर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यासाठी हजारो नागरिकांनी आपल्या मानसिक त्रासाचीआहुती दिली आहे. त्यामुळे या पुलावरचे डांबर आणखी दिवस शाबूत राहते की येणाऱ्या पावसाळ्यात त्याचाही मुखवटा गळून पडतो हा खरा प्रश्न आहे. हजारो- लाखो लोकांना तब्बल 20 दिवस वेठीस धरून केलेले हे काम जर व्यवस्थित झालेले नसेल तर मग या सर्व नरकयातना भोगण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असे इथल्या नागरिकांनी मनाशी घट्ट करून ठेवावे. आणि मुकाटपणे हे अत्याचार सहन करत रहावे.

