Site icon LNN

डोंबिवली पूर्व येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

– राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्रासाठी नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

– डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली |९ ऑक्टोबर
महाराष्ट्र राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतीला नवसंजीवनी मिळावी, शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या मंगल संकल्पनेतून डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून आयोजित शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री. रवींद्रजी पाठक यांच्या उपस्थितीत ‘नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागा’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन पर्जन्यवृष्टी चांगली व्हावी, शेती-बागायतींना भरभराट लाभावी, शेतकरी सुखी व्हावा आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध व्हावे, या प्रार्थनेसह हा महायाग करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित नऊ दिवस देखील विविध पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तर याचा शुभारंभ ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजत सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत कार्यक्रमाने होणार आहे. (Religious, Cultural and Social Programmes Organised in Dombivli East for Sharadiya Navratri Festival)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि अतिशय भव्य स्वरूपात नवरात्रौत्सव साजरा करण्यात येते. डीएनसी शाळेच्या मैदानात दरवर्षी मोठ्या उत्साहात रासरंग दांडिया उत्सव आयोजन करण्यात येते. याला उत्सवाला मोठया संख्येने गरबाप्रेमी नागरिक उपस्थित राहतात. मात्र यंदा राज्यातील बळीराजा दुष्काळाच्या मोठया संकटात सापडलेला असताना सामाजिक भान जपत खासदार डॉ. शिंदे यांनी दांडिया कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होणार असून, प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री. रवींद्रजी पाठक यांच्या उपस्थितीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घटस्थापना आणि सप्तशती पाठवाचन होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची आराधना, मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. नवरात्रोत्सव हा शक्तीची उपासना, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि समाजातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. याच भावनेतून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा आणि विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

या उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ विविध धार्मिक महोत्सव’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने शास्त्रीय संगीत आणि भक्तिसंगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणामुळे संगीतप्रेमींना सुरेल मैफलीचा आनंद अनुभवता येणार आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक वातावरणाला सांगीतिक अभिव्यक्तीची जोड देणारा हा कार्यक्रम उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

उत्सवाच्या कालावधीत दररोज विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ वाजल्यापासून महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शृंगार महापूजा, अलंकार आरती, देवीची महापूजा, सप्तशती पाठवाचन, होमहवन, देवीची अर्चना, सांजआरती आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक उपक्रमांचा समावेश आहे. दररोज सकाळी ९.३० वाजता देवीची महापूजा आणि सप्तशती पाठवाचन, सकाळी ११ वाजता होमहवन व महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता देवीची अर्चना आणि सायंकाळी ४ वाजता होमहवन, सांजआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम नियोजित आहेत. या सर्व उपक्रमांमुळे भाविकांना नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या उपासनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तर यादरम्यान दररोज ७२ जोडप्यांच्या उपस्थितीत महापूजा देखील करण्यात येणार आहे.

या नवरात्रोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांसाठी उभारण्यात येणारे तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारे भव्य सभामंडप . धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने या विशेष संकल्पनेची मांडणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, निसर्गाची कृपा लाभावी आणि राज्यात सुख-समृद्धी नांदावी, या भावनेला महायागाच्या संकल्पनेत विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

शारदीय नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा, महिला शक्तीचा गौरव करणारा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा उत्सव आहे. याच विचारातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाने धार्मिक विधींसोबतच संगीत, कीर्तन, भजन, लोककला आणि महिला व युवकांसाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवाच्या माध्यमातून डोंबिवलीतील नागरिकांना भक्ती, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे डोंबिवली आणि परिसरातील भाविक, नागरिक, महिला, युवक तसेच संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रसिकांनी या नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. चेतन महाराज यांचे हरिपाठ आणि कीर्तन होणार आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता माता की चौकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता महिला भजनी मंडळ उत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या भक्तिसंगीताला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता महिला भोंडला आणि झी टीव्ही सारेगमपच्या कलावंतांचा भक्तिमय संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता माथी मटूकडी आणि श्रीदेवी महिषासुरमर्दिनी नाट्यविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता नंदेश उमप यांचा जागर देवीचा उत्सव रंगणार असून, सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता युवकांसाठी विशेष ‘ दि फोक मराठी’ आणि पारंपरिक गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून भक्तिसंगीत, लोककला, महिला सहभाग, युवकांचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.

Exit mobile version