कल्याण दि.8 एप्रिल :
मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेला आयोजित भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर संवाद साधत आगामी रणनीती स्पष्ट केली. (Remove term: Bhiwandi Lok Sabha Review Meeting: MP Dr. Shrikant Eknath Shinde Guides on SIR Bhiwandi Lok Sabha Review Meeting: MP Dr. Shrikant Eknath Shinde Guides on SIR)
या बैठकीत भारतीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेवर विशेष भर देण्यात आला. ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्ट सूचना देत, प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घेऊन मतदारांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या बीएलएंना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न आणि मतदारसंघातील विविध प्रलंबित मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. पक्षाची ध्येयधोरणे, विचार आणि लोककल्याणाची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनसेवेचा वारसा अधिक भक्कम करत मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

