Site icon LNN

सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवड

महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी

कल्याण | २२ ऑगस्ट :
महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA)च्या गव्हर्निंग कौन्सिलवर कल्याणातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांची स्वीकृत सदस्य (Co-opted Member) म्हणून निवड करण्यात आली आहे. (Renowned Builder Milind Chavan Elected as a Co-opted Member of the Governing Council of Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture)

संस्थेला १०० हून अधिक वर्षांचा वारसा…
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ही महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राची सर्वोच्च संस्था म्हणून कार्यरत आहे. या संस्थेला १०० हून अधिक वर्षांचा वारसा असून राज्यातील ८०० हून अधिक व्यापार -औद्योगिक संघटना, सुमारे ६ हजार थेट सदस्य आणि जवळपास ४० लाख व्यापार-औद्योगिक घटकांशी ही संस्था जोडली गेली आहे.

उद्योजकांच्या विविध मुद्द्यांवर काम करण्याची संधी…
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र प्रसिद्ध केले असून मिलिंद चव्हाण हे पुढील २ वर्षे संस्थेमध्ये कार्यरत असतील. ज्याद्वारे चव्हाण यांना राज्यातील व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक विषय, व्यावसायिक प्रश्न तसेच उद्योजकांसमोरील अडचणी आदी मुद्द्यांवर या व्यासपीठावरून काम करण्याची संधी मिळाली आहे.

राज्याच्या आर्थिक विकासाला संस्था देतेय चालना…
सरकारी धोरणांमध्ये उद्योग क्षेत्राचा सहभाग, उद्योगस्नेही धोरणे, उद्योजकांसाठी नव्या व्यावसायिक संधी आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी ठळक मुद्दे आहेत. संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांसाठी प्रशिक्षण- कार्यशाळा, निर्यातदारांसाठी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन (Certificate of Origin), व्यवसायासाठी व्हिसा सुविधा (Visa Facilitation) तसेच आर्बिट्रेशन (Arbitration) आणि मेडिएशन (Mediation)यांसारख्या सेवाही उपलब्ध करून दिल्या जातात.

म्हणून मिलिंद चव्हाण यांची गव्हर्निंग कौन्सिलवरील नियुक्ती महत्त्वपूर्ण…
या पार्श्वभूमीवर मिलिंद चव्हाण यांची गव्हर्निंग कौन्सिलवरील नियुक्ती कल्याणच्या स्थानिक व्यापारी- उद्योजक क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. तसेच कल्याण- डोंबिवलीतील व्यवसाय, उद्योग, पायाभूत सुविधा, स्थानिक व्यावसायिक अडचणी आणि नवउद्योजकांच्या गरजा आदी मुद्दे राज्यस्तरीय उद्योग संघटनेच्या व्यासपीठावर मांडण्यासाठी या जबाबदारीचा उपयोग होऊ शकतो.

व्यापक पातळीवर करण्याची मोठी जबाबदारी…
गव्हर्निंग कौन्सिलमध्ये राज्यातील विविध विभागांतील प्रतिनिधींचा समावेश असून संस्थेच्या कार्यातून स्थानिक पातळीवरील उद्योग-व्यवसायाच्या प्रश्नांना व्यापक धोरणात्मक व्यासपीठ मिळते. त्यामुळे या नियुक्तीच्या माध्यमातून आपल्याला कल्याणच्या व्यापारी आणि उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व अधिक व्यापक पातळीवर करण्याची मोठी जबाबदारी प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया मिलिंद चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version