९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत बंदी लागू, आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
ठाणे ९ नोव्हेंबर |
ठाणे जिल्ह्यात आगीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवितासह सार्वजनिक व खासगी मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. (Rising Fire Incidents Prompt Rocket Firecracker Ban Across Thane District; Collector Dr. Shrikrishna Panchal Issues Orders!)
९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०१ वाजल्यापासून ते ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
जिल्ह्यात अलीकडच्या काळात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही नागरिकांकडून हवेत उडणारे रॉकेट आणि तत्सम फटाके उडविले जात असल्याचे, तर काही ठिकाणी रॉकेट थेट हातात धरून धोकादायक पद्धतीने उडविले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांमुळे आगीच्या दुर्घटनांचा धोका वाढण्याबरोबरच सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः दाट लोकवस्तीच्या परिसरात, निवासी इमारतींच्या गच्च्यांवर, बाल्कनीमध्ये, इमारतींच्या आवारात, पार्किंग क्षेत्रात तसेच रिफ्यूज एरियामधून रॉकेट आणि हवेत उडणारे फटाके उडविले जात असल्याने इमारतींना आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्घटनांमुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी बंदी लागू…
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रतिबंध असेल. ही बंदी केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित नसून खासगी जागा, निवासी इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, इमारतींचे आवार आणि इतर रहिवासी परिसरांनाही लागू राहणार आहे.
उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई…
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीतील सर्व सभासदांना या आदेशाची माहिती देऊन त्याचे पालन करण्याबाबत जागरूक करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आदेशाचे पालन करण्यास नकार देणाऱ्या किंवा त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ आणि ६० अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाची तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इतर प्रकारच्या फटाक्यांचा वापर प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकरणांचे आदेश आणि लागू न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहून करता येणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य…
सण-उत्सव साजरे करताना नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांचा वापर टाळून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

